छत्रपती संभाजीनगर येथे रॅगिंग करणारे ३ विद्यार्थी निलंबित !

छत्रपती संभाजीनगर – कनिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचे रॅगिंग केल्‍याप्रकरणी घाटी रुग्‍णालयातील ३ वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांना ६ महिन्‍यांसाठी निलंबित केले आहे. त्‍यांना २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला असून त्‍यांना वसतिगृहात कायमस्‍वरूपी प्रतिबंध करण्‍यात आला आहे. त्‍यांना ग्रंथालयातही येण्‍यास बंधन घालण्‍यात आले आहे’, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालयाचे (घाटी) अधिष्‍ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. (रँगिंगची कीड मुळापासून नष्‍ट करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांना नीतीमत्ता वाढवणारे शिक्षण देणेही आवश्‍यक ! – संपादक)

‘एम्.बी.बी.एस्.’च्‍या तृतीय वर्षातील ६ विद्यार्थी द्वितीय वर्षातील ६ विद्यार्थ्‍यांना चहा, कॉफी, न्‍याहारी आणि सिगारेट आणायला सांगून त्रास देत होते. हा प्रकार ३ महिन्‍यांपासून चालू होता. ८ जूनच्‍या रात्री द्वितीय वर्षातील एका विद्यार्थ्‍याने तृतीय वर्षातील विद्यार्थ्‍यांचे काम ऐकले नाही. त्‍यामुळे त्‍यातील एका विद्यार्थ्‍याने त्‍याची कॉलर पकडून शिवीगाळ केली. या प्रकारामुळे चिडलेल्‍या विद्यार्थ्‍याने वडिलांना ही माहिती कळवली.

वडिलांनी रुग्‍णालय प्रशासन आणि ‘अँटी रॅगिंग समिती’कडे या संदर्भात तक्रार केली. समितीने तातडीने बैठक घेऊन तक्रारीनुसार चौकशी केली. या चौकशीअंती रॅगिंग झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.