Israeli Embassy Advised Citizen : इस्रायली नागरिकांनी भारतातील सुंदर समुद्रकिनार्‍यांना भेट द्यावी !

भारतातील इस्रायलच्या दूतावासाने मालदीवला प्रत्युत्तर देत केले आवाहन !

नवी देहली –मालदीवने इस्रायलच्या नागरिकांना मालदीवमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मोठे पडसाद इस्रायलमध्ये उमटले. भारतातील इस्रायलच्या दूतावासानेही ‘एक्स’वर भारतातील लक्षद्वीप, गोवा, अंदमान- निकोबार बेटे आणि केरळची नयनरम्य छायाचित्रे प्रसारित करत इस्रायली नागरिकांना पर्यटनासाठी भारतात येण्याचे आवाहन केले आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मालदीवने आता इस्रायली नागरिकांच्या येण्यावर बंदी घातली असल्याने येथे आम्ही काही सुंदर आणि आश्‍चर्यकारक भारतीय समुद्रकिनार्‍यांची छायाचित्रे प्रसारित करत आहोत. याठिकाणी इस्रायली पर्यटकांचे मनापासून स्वागत केले जाईल अन् त्यांना अत्यंत आदराने वागवले जाईल.