रत्नागिरीत विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार! – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी – स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या शिखर संमेलनात झालेल्या एका करारानुसार येथे विजेवरच्या वाहनांच्या निर्मितीचा कारखाना चालू होणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरी औद्योगिक क्षेत्रात नव्या अतिथीगृहाचे बांधकाम आणि जुन्या अतिथीगृह इमारतीचे नूतनीकरण करण्याच्या कामांचे भूमीपूजन मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले,

१. अमेरिकेतील एका आस्थापनाशी याविषयी करार झाला असून पुढची प्रक्रिया लवकरच चालू होईल.

२. रत्नागिरीतील औद्योगिक विकास आणि मूलभूत सुविधांसाठी ८८ कोटी रुपयांची योजना आहे. यातील शिरगाव, नाचणे, निवसर, निवळी, मिरजोळे, टिके या ग्रामपंचायतींतील रस्त्यांसाठी ३१ कोटी रुपये, तर औद्योगिक क्षेत्रासाठी आवश्यक अन्य रस्त्यांसाठी १३ कोटी रुपये संमत करण्यात आले आहेत.

३. रत्नागिरीत येणार्‍या मोठ्या उद्योजकांना, तसेच येथील उद्योजकांना बैठक घेण्यासाठी ‘सेव्हन स्टार’ विश्रामगृह पाहिजे, यासाठी राज्यातील सर्वांत सुंदर आणि सर्व सोयींनी सुसज्ज विश्रामगृह रत्नागिरीत उभारले जात आहे.

४. जुन्या विश्रामगृहालाही बरीच वर्षे झाली असल्याने त्याचेही नूतनीकरण करण्यात येत आहे.

५. लोटे औद्योगिक क्षेत्रासाठी ७ कोटी, ‘वॉटर सोर्स’ टाकीसाठी १२ कोटी रुपये निधी संमत करण्यात आला आहे.

६. रत्नागिरी औद्योगिक क्षेत्रातील ८८ कर्मचार्‍यांना कायम करण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे.

७. शैक्षणिक क्षेत्राचा विचार करता अभियांत्रिकी महाविद्यालय चालू झाले. वैद्यकीय महाविद्यालयही येथे होत आहे. यामुळे रत्नागिरीतील ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.