‘जगामध्ये घडणार्या घटना ईश्वरी नियोजनानुसार घडत असतात. ईश्वराचे हे नियोजन संतांना कळते, तसेच काही स्थूल-सूक्ष्म अनुमानांच्या आधारे भविष्यवेत्त्यांनाही हे कळते. त्यानुसार ते भविष्य सांगतात. सर्व देवाच्या नियोजनाप्रमाणे होत असले, तरी देवाने मनुष्याच्या क्रियमाणासाठी काही भाग राखून ठेवला आहे. मनुष्याने त्याचे क्रियमाण चांगल्या कार्यासाठी वापरले, तर काही वेळा अघटित घडायचे टळते, उदा. समाज साधना करू लागल्याने सात्त्विकता वाढली, तर तमोगुण न्यून होऊन त्याच्यामुळे घडणारे दुष्परिणाम आपोआप टळतात.
काही वर्षांपासून अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी ‘वर्ष २०२३ पर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे सांगितले होते. सध्याची जगाची स्थिती पाहिली, तर गेल्या काही वर्षांपासून जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. कधीही युद्ध होऊन अनेक देश उद्ध्वस्त (बेचिराख) होऊ शकतात. असे असले, तरी अनेक संत हा नरसंहार टाळण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत आणि ते त्यांच्या प्रयत्नांमध्ये यशस्वीही होत आहेत. याची स्थुलातील प्रचीती म्हणजे ‘गेल्या ३ – ४ वर्षांत अनेक देशांमध्ये युद्धजन्यस्थिती निर्माण होऊन ती निवळली आहे.’ याच कारणास्तव सध्याच्या काळात येणारा आपत्काळ काही कालावधीसाठी थोडा पुढे गेला आहे. वर्ष २०२५ पर्यंत हिंदु राष्ट्र स्थापन होईल.
पूर्वानुमाने संतांनी वर्तवलेला आपत्काळ पुढे गेला असला, तरी त्याचा आरंभ कधीही होऊ शकतो. कोरोनासारख्या महामारीच्या माध्यमातून आपण सर्वांनी हा अनुभव घेतलाच आहे. तिसरे महायुद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यामुळे साधकांनी आपत्काळाची सिद्धता चालूच ठेवावी.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (१.१२.२०२१)