रुग्ण सेवा प्रकल्पाच्या वतीने ग्रामीण भागातील ६०० महिलांनी फुलवल्या आरोग्य परसबागा !

रुग्ण सेवा प्रकल्पाच्या वतीने सिद्ध करण्यात आलेल्या पुस्तिकेचे मुखपृष्ठ

मिरज, ११ डिसेंबर (वार्ता.) – रुग्ण सेवा प्रकल्पाच्या वतीने मिरज आणि तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील ६०० महिलांनी त्यांच्या परसदारी आरोग्य परसबागा फुलवल्या आहेत. त्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सहकार्य लाभले. मिरज तालुक्यातील ५० आणि तासगाव तालुक्यातील २० गावांमध्ये कोरोना जनजागृतीपर प्रकल्प ‘रुग्ण सेवा प्रकल्प मिरज’ ही संस्था राबवत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्य परसबाग निर्मिती हा एक उपक्रम आहे. परसबाग कशी फुलवायची ? याविषयी प्रारंभी महिलावर्गाचे प्रबोधन करण्यात आले. केवळ १०० रुपये इतक्या अत्यल्प खर्चामध्ये हा प्रकल्प राबवला गेला.

या उपक्रमात सहभागातून त्यांचे कुटुंबीय यांना पुरेल इतका ताजा भाजीपाला पुढील काही मासांत मिळणार आहे. प्रकल्प समन्वयक म्हणून डॉ. भालचंद्र साठये मार्गदर्शन करत असून रघुनाथ कांबळे, आकाश शेलार आणि विकास पाटील हे कार्यक्रमाचे नियोजन करत आहेत.