मुंबईमध्ये १२ डिसेंबरपासून मोर्चे आणि आंदोलने यांवर बंदीचा आदेश !

मुंबई – मालेगाव, अमरावती येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर १२ डिसेंबर २०२१ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधीत मुंबईमध्ये मोर्चे, आंदोलने यांवर बंदी असल्याचा आदेश मुंबई पोलिसांकडून काढण्यात आला आहे. ११ डिसेंबरची मध्यरात्र म्हणजे १२ डिसेंबरला रात्री १२ पासून बंदीचा आदेश लागू होणार आहे.

मुसलमान समाजाला आरक्षण मिळावे आणि वक्फ मंडळाच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे, या मागण्यांसाठी ऑल इंडिया मजलिस इतहाद-उल मुसलमान पक्ष (‘एम्.आय.एम्.’) कडून राज्यात तिरंगा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले होते. या मोर्च्यासाठी ‘एम्.आय.एम्.’चे कार्यकर्ते राज्यातील विविध भागांतून ११ डिसेंबर या दिवशी मुंबई येथे आले होते. कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या विषाणूच्या संसर्गाचा धोका आणि काही दिवसांपूर्वी राज्यात निर्माण झालेली दंगलसदृश्य परिस्थिती या कारणास्तव या मोर्च्याला पोलिसांकडून अनुमती नाकारून आंदोलने आणि मोर्चे यांवर बंदी घातली आहे.

मुंबई पोलिसांनी काढलेला आदेश अंतिम राहील ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलिसांनी मुंबई परिसरात मोर्चा, सभा यांवर बंदीचा आदेश काढला आहे. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा सामाजिक संस्था यांना अशा प्रकारचा कार्यक्रम घेता येणार नाही. पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ते निर्णय घेतात. मुंबई पोलिसांनी जो आदेश काढला आहे, तो अंतिम राहील.