वास्को, १२ ऑगस्ट (वार्ता.) – येथे १४ ऑगस्टपासून चालू होणार्या श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या निमित्ताने भाविकांनी मंदिरात येण्याचे टाळून घरीच बसून देवाला प्रार्थना करावी. कोरोना महामारीचे सावट अजूनही कायम असून त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी श्री दामोदर भजनी सप्ताह केवळ धार्मिक पद्धतीने साजरा केला होता. यंदाही त्याच पद्धतीने सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री दामोदर भजनी सप्ताह कार्यकारी समितीचे प्रमुख श्री. प्रशांत जोशी यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. जगदीश दुर्भाटकर, खजिनदार श्री. विष्णु गारोडी आणि सचिव श्री. संतोष खोर्जुवेकर उपस्थित होते.
१४ ऑगस्टला सप्ताहाच्या पहिल्या दिवशी दुपारी १२ वाजता केवळ १५ जणांच्या उपस्थितीत श्रीफळ ठेवून भजनाला प्रारंभ केला जाईल. त्यानंतर ८ भजनी कलाकारांच्या उपस्थितीत गजराने भजनाचा प्रारंभ करून लगेच भजनाची समाप्ती होणार आहे. पुढील २४ घंटे मंदिरात अखंड चालू रहाणारे भजन यंदा फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमातून भाविकांना दाखवले जाणार आहे. दुपारी २ वाजल्यानंतर मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. पुढील २ दिवस मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या समोरील स्वतंत्र पथ मार्ग पत्रे उभारून बंद केला जाणार आहे. यंदाही विविध समाजांकडून मंदिराकडे पारंपरिक पार (गट) येणार नसून त्याऐवजी प्रत्येक गटातील ३ प्रतिनिधींना दुपारी अर्धा घंट्याच्या अंतराने मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. रविवारी दुपारी गोपाळ काल्यासाठी केवळ ४ जणांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरातील प्रवेशासंबंधी सरकारी नियमांचे पालन केले जाणार असून ओळखपत्र वितरित केलेल्यांची सूचीही उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांना देण्यात आली आहे.