मानाच्या पालख्यांतील वारकर्यांविना बाहेरून येणार्या कुणालाही प्रवेश नाही
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर १८ जुलैच्या सकाळपासून येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये ३ सहस्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. २० जुलै या दिवशी आषाढी एकादशी आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी प्रतिकात्मक पद्धतीने साजरी करण्यात येणार असून १० मानाच्या पालख्यांतील वारकर्यांविना अन्य कोणत्याही व्यक्तीला पंढरपूर शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
१८ जुलैपासून चालू झालेल्या संचारबंदीमुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेड्सच्या साहाय्याने बंद करण्यात आले असून चंद्रभागा नदीकडे जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता पंढरपूर मध्ये अन्य सर्व आस्थापन संचारबंदीच्या कालावधीमध्ये बंद असणार आहेत.
२४ जुलै (आषाढ पौर्णिमा) या दिवशी महाद्वार काल्याचा सोहळा होणार आहे. त्यानंतर सर्व पालख्या शहरातून बाहेर गेल्यानंतर संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे.