रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे दांपत्य पोलिसांच्या कह्यात !

रेमडेसिविरचा काळाबाजार पूर्णपणे थांबण्यासाठी काळाबाजार करणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी.

सातारा, १३ मे (वार्ता.) – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या दांपत्यास शाहूपुरी पोलिसांनी कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ इंजेक्शन शासनाधीन करण्यात आली आहेत.

जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळालेल्या माहितीवरून प्रताप भोसले यांच्या पथकाने समर्थमंदिर परिसरात सापळा रचला. त्यानुसार पोलिसांना प्रशांत सावंत आणि सपना प्रशांत सावंत यांच्याकडे मूळ किमतीहून अधिक किमतीने विक्री करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन आढळून आले. पोलिसांनी सावंत दांपत्यास कह्यात घेत दुचाकी वाहन आणि २ रेमडेसिविर इंजेक्शन, असा २१ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.