१२ नोव्हेंबर – पंढरपूर कार्तिक यात्रा विशेष !
पंढरपूर – मागील अनेक मोठ्या यात्रांमध्ये विठ्ठलाच्या मुखदर्शन रांगेचे योग्य नियोजन नसल्याने भाविकांची योग्य सोय ऐन यात्रा कालावधीत होत नव्हती. त्यामुळे कार्तिक यात्रेच्या निमित्ताने मुखदर्शन रांगेसाठी प्रदक्षिणा मार्गावर छत्रपती संभाजी चौक येथे उड्डाणपूल सिद्ध करण्यात आला आहे. यामुळे मुखदर्शन रांग सुलभ होऊन जाणार्या-येणार्या भाविकांना रस्ता चालू रहाणार आहे. या ठिकाणी पूर्णवेळ तांत्रिक कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आषाढी यात्रेच्या कालावधीत या मार्गावर अधिक उंचीचा रथ आल्यास हा पूल सरकवण्याची सोय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी प्रदक्षिणा मार्गावर येणार्या रथांना कोणताही अडथळा होणार नाही.
चंद्रभागेच्या तीरावर महिला भाविकांसाठी १० विशेष खोल्यांची व्यवस्था !
श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागेत स्नान करतात. यंदा महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे पालटण्यासाठी १० विशेष खोल्यांची व्यवस्था मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याखेरीज महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने २४ घंटे महिला सुरक्षा कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याच समवेत यात्रा कालावधीत महिला भाविकांच्या सुविधेसाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, पत्राशेड, श्री विठ्ठल सभामंडप या ४ ठिकाणी हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. श्रींच्या दर्शन रांगेत महिला भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस कर्मचार्यांच्या व्यतिरिक्त मंदिरे समितीच्या वतीने महिला स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत.