‘वस्त्रहरण’…. आदर्श आणि संस्कृती यांचे !

‘महाभारत’ हे महाकाव्य भारतीय हिंदु संस्कृतीची एक वेगळी ओळख आहे. महाभारतातील युद्धात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या दिव्य उपदेशातून ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाचा उगम झाला. सहस्रो वर्षांनंतर आजही हिंदूंसाठी गीता परमवंदनीय आहे. धर्म आणि अधर्माचा लढा, म्हणजे महाभारत, असत्यावर सत्याने मिळवलेला विजय म्हणजे महाभारत. जीवनात कसे वागावे आणि कसे वागू नये, कुणाची संगत  करावी अन् कुणाची करू नये, कोणत्या प्रसंगात कोणते निर्णय घ्यावेत, भगवंताच्या अधिष्ठानाचे महत्त्व आदी गोष्टी महाभारतातून शिकायला मिळतात. महाभारतातील प्रत्येक व्यक्तीरेखेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. त्या प्रत्येक व्यक्तीरेखेने जनमानसांत एक वलय निर्माण केले आहे, जे आजही अबाधित आहे.

सर्वश्रेष्ठ प्रतिज्ञा आजही ‘भीष्मप्रतिज्ञा’ म्हणून ओळखली जाते. ‘श्रेष्ठ धनुर्धारी’ म्हणून आजही अर्जुनाचे नाव घेतले जाते. क्रीडाक्षेत्रातील प्राविण्याविषयी प्रतिवर्षी भारत सरकारच्या वतीने ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो. महाबली हनुमानानंतर बलशाली म्हणून नाव घेतले जाते ते भीमाचे ! प्राचीन भारतीय संस्कृतीतील ५ पतिव्रतांमध्ये द्रौपदीचे नाव आजही आदराने घेतले जाते. सत्यवचनी म्हणून धर्मराज युधिष्ठिरांनी स्वतःचे नाव अजरामर केले आहे. अशा एक ना अनेक आदर्श पात्रातून निर्माण झालेले महाभारत माता जिजाऊंच्या मुखातून ऐकूनच छत्रपती शिवाजी महाराज लहानाचे मोठे झाले. ज्यांनी शून्यातून स्वराज्याची निर्मिती केली. अशा हिंदु धर्मातील आदर्शवत् आणि पवित्र ग्रंथातील व्यक्तीरेखांना विनोदी स्वरूपात दाखवून त्यावर थुकरट विनोद निर्माण करणारे एक नाटक (वस्त्रहरण) पुन्हा एकदा रंगभूमीवर झळकले असून नाट्यरसिकांकडून या नाटकाला उदंड प्रतिसादही मिळत आहे.

 

१. विनोदाच्या नावावर नाटकात करण्यात आलेले विडंबन

श्री. जगन घाणेकर

कोकणामध्ये स्थानिक कलावंत दशावतारांवर आधारित नमन आणि दशावतार सादर करतात. लग्न असो वा महापूजा संध्याकाळी नमन किंवा दशावताराचा कार्यक्रम हा ठरलेला असतो. या कार्यक्रमांतून सादर करण्यात येणारी कथा आणि संगीत सारखेच असले, तरी ते पहाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी शेकडोंचा जनसमुदाय गोळा होतो. असाच एक दशावतार सादर करणार्‍या मंडळींच्या पडद्यामागील घडामोडी आणि लोकांसमोर ते सादर करतांना झालेली फजिती दाखवणारे आणि गंगाराम गवाणकर लिखित कै. रमेश रणदिवे दिग्दर्शित ‘संगीत वस्त्रहरण’ हे नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर आले आहे. महाभारतातील आदर्शवत् व्यक्तीरेखांवर या नाटकातून केलेले थुकरट विनोद पाहिल्यावर कोणत्याही हिंदु धर्मप्रेमींची तळपायाची आग मस्तकात गेल्यावाचून राहणार नाही. यातील अर्जुनाची भूमिका करणारे पात्र संपूर्ण नाटकात दारू पिऊन तर्र झालेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत हे पात्र चित्रविचित्र चाळे करतांना दाखवले आहे. हे पात्र नाटकातील भीमाचे पात्र करणार्‍याला लाथ मारतांना, रंगमंचावर ठुमके देत येतांना आणि दारूच्या नशेत रंगमंचावर कोसळतांना दाखवण्यात आले आहे.

महाभारतातील विदुराची कृष्णभक्ती सर्वांनाच ज्ञात आहे. स्वतः पितामह भीष्मसुद्धा विदुराचा सल्ला घेत; मात्र या नाटकात विदुराला विडी ओढतांना आणि तमाशातील महिलेसह नृत्य करतांना दाखवण्यात आले आहे. महापराक्रमी भीष्मांची महाभारतात ‘पितामह’ म्हणून वेगळी ओळख आहे. भगवान श्रीकृष्णही भीष्मांचा आदर करत. अशा पितामह भीष्मांची भूमिका करणार्‍या पात्राला भीष्मांच्या वेशभूषेत ‘बीलनची नागीण निघाली…’ या गाण्यावर रंगमंचावर अचकट विचकट चाळे करत नाचतांना दाखवण्यात आले आहे. ‘कुत्र्याला बोलावतात’, तशा प्रकारे या नाटकातील विदुर धर्मराज युधिष्ठिराला बोलावतांना दाखवले आहे. यातील शकुनीमामा युधिष्ठिराला ‘तुझ्या आयशीचा घो’, म्हणत हिणवतांना दाखवला आहे.

पतिव्रता म्हणून ओळख असलेल्या ज्या द्रौपदीच्या वस्त्रहरणावरून संपूर्ण महाभारताचे महायुद्ध घडले, ती द्रौपदी या नाटकात अर्वाच्च भाषेत भांडतांना दाखवण्यात आली आहे. स्वतःच्या साडीचा पदर स्वतःहून कौरव आणि पांडव यांच्या हाती देऊन स्वतःचे वस्त्रहरण करण्यास सांगत असतांना दाखवली आहे. यामध्ये इंद्रदेवांचा उल्लेख ‘कामाठापुराचा देव’, असा करण्यात आला आहे. ‘वसाड्या’, ‘तुझ्या आयशीचा घो’ यांसारख्या शिव्या पांडवांच्या तोंडी वेळोवेळी दाखवण्यात आल्या आहेत. इंद्राची भूमिका करणार्‍या पात्राच्या अंगात देव येतो आणि तो बाईचे नृत्य बघण्याची मागणी करतांना यामध्ये दाखवण्यात आले आहे. नाटकातील सरपंचाच्या झोपण्याला ‘सार्वजनिक गणपति झोपला’, असे उल्लेखण्यात आले. विनोदाच्या नावावर असे एक ना अनेक प्रसंग या नाटकातून सादर करण्यात आले आहेत.

२. …अन्यथा काळ सोकावेल !

अभिव्यक्ती आणि लोककला सादर करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने बहाल केले असले, तरी त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी ते सादर करणार्‍याने घ्यायला नको का ? महाभारतातील व्यक्तीरेखा या हिंदु धर्मियांसाठी नेहमीच आदर्शवत् राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा विनोदासाठी अत्यंत विकृतपणे वापर करणे, हे निषेधार्हच आहे. नाटक, स्टँडअप कॉमेडी, चित्रपट यांतून विनोद सादर करायचा, तर त्यासाठी पुराण आणि इतिहास यांतील पात्रे, साधूंच्या व्यक्तीरेखा घेण्याचे ‘फॅड’ मध्यंतरी निर्माण झाले होते. काही जागृत हिंदु आणि धर्मप्रेमी संघटना यांनी वेळोवेळी केलेल्या विरोधामुळे या गोष्टींना आता आळा बसू लागला आहे. ‘संगीत वस्त्रहरण’ या नाटकातून पुन्हा विनोदाच्या नावावर महाभारतातील आदर्श पात्रांचा अवमान करण्यात आला आहे. त्यामुळे या नाटकाच्या सादरीकरणावर अंकुश घालण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून करण्यात येत आहे. लोककलेच्या नावाखाली विनोद निर्मितीसाठी आदर्श व्यक्तीरेखांना पायदळी तुडवण्याचा प्रघात एकदा पडला की, भविष्यात भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, म. गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या आदर्श व्यक्तीरेखांवरही सर्रासपणे थुकरट विनोद केले जातील.

३. …तर समाजाचे नैतिक अध:पतन होण्यास वेळ लागणार नाही !

प्रतिदिन घडणार्‍या घटनांवरून समाजातील अनैतिकता वाढू लागली आहे, हे आपण पहातच आहोत. विनोदाच्या नावाखाली आदर्श व्यक्तीरेखांवर चेष्टामस्करी होऊ लागली, तर समाजाचे नैतिक अध:पतन होण्यास वेळ लागणार नाही. ‘आदिपुरुष’ या हिंदी चित्रपटातील काही प्रसंग आणि व्यक्तीरेखा यांविषयीचा वाद जेव्हा न्यायालयात गेला, तेव्हा न्यायालयानेही ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्यालाही मर्यादा असते’, असे सांगत निर्मात्याला फटकारले होते.

‘विज्ञापने, नाटके, स्टँडअप कॉमेडी, चित्रपट आदी माध्यमांतून अभिव्यक्तीच्या नावाखाली हिंदु धर्म, धर्मग्रंथ, आदर्श व्यक्तीरेखा, संत, महापुरुष यांचे केले जाणारे विडंबन थांबावे’, यासाठी कायदा करण्याची मागणीही यानिमित्ताने हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. या सर्वांत आश्चर्य वाटते, ते अशी नाटके पहायला जाणार्‍या प्रेक्षकांचे ! स्वतःच्या आईवडिलांवर कुणी थुकरट विनोद केले, तर आपण ते सहन करू का ? मग आपल्या आदर्शांना अशा प्रकारे अचकट विचकट चाळे करतांना पाहून आपण त्याकडे हसून दुर्लक्ष कसे काय करू शकतो ? विनोद निर्मितीसाठी पुराणातील पात्रे वा साधूच का लागतात ? त्यांच्याखेरीज निखळ विनोद असू शकत नाही का ? मायबाप प्रेक्षक जोपर्यंत हे नाट्य आणि चित्रपट निर्मिती करणार्‍यांना योग्य प्रकारे समज देत नाहीत, तोपर्यंत हे असेच चालू राहणार. त्यासाठी रसिक प्रेक्षकांनी पुढे यायला हवे !’

– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई. (२३.८.२०२४)