मंगळागौरीचे व्रत !

मंगळागौर पूजन

काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते एका मुलाखतीत म्हणाल्या, ‘‘मला एका महिला पत्रकाराने ‘मंगळागौर म्हणजे काय ?’, असे विचारले होते. तिला याबद्दल माहिती नव्हती. मी तिला म्हटलं, लग्नानंतर सर्व सोहळे संपतात. त्यानंतर हनिमूनला जातात. त्याचा ताण काढण्यासाठी जे खेळ खेळले जातात, त्याला ‘मंगळागौर’ म्हणतात. हा खेळ फार मजेशीर असतो. सासूला शिव्या द्या, नणंदेला शिव्या द्या. असं सर्व त्यात असतं.’’ वंदना गुप्ते ज्येष्ठ आणि नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. त्यांचे अनेक चाहते आहेत; परंतु त्यांनी असे विधान केल्यामुळे मंगळागौर या धार्मिक व्रताचे महत्त्व लक्षात येणे तर दूरच; परंतु तो एक थट्टेचा आणि गमतीचा विषय होऊन गेला.

मंगळागौरीच्या रात्री खेळ खेळण्याची गंमत-जंमत आहेच; पण त्याचे व्रतविधान हे धार्मिक आहे. भारतीय संस्कृतीत चातुर्मासातील व्रतविधानांना मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. ‘जिथे भाव तिथे देव’, याप्रमाणे व्रतविधाने जेवढ्या भावपूर्ण करू, तेवढी त्याची प्रचीती येते. ‘मंगळागौर’ या व्रतामध्ये अन्नपूर्णादेवीची यथासांग पूजा केली जाते. अन्नपूर्णादेवी महिलांसाठी जवळची तर आहेच; परंतु ती अन्न देणारी देणारी देवी असल्यामुळे ती सर्वांसाठीही ती तितकीच पूजनीय आहे. मुलगी लग्न होऊन सासरी जाते, त्या वेळी तिला ‘अन्नपूर्णादेवी’ची मूर्ती समवेत देतात. ती देवघरात ठेवली जाते. प्रतिदिन तिचे पूजन होते. भारतात अध्यात्म हे सर्वाेच्च प्रगत स्थितीला असल्याने प्रत्येक छोट्या गोष्टी साध्य करून देणार्‍या विविध देवता असतात; जसे धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आदी. तशीच ही अन्नपूर्णादेवी संपूर्ण कुटुंबाला अन्न पुरवणारी देवता आहे. मंगळागौरीला  शिवपूजनही आहे. उपवासाचे व्रतविधान आरोग्याची काळजी घेणारे आहे. १६ प्रकारच्या पत्री आणि फुले अर्पण करायची असल्याने या काळात फुललेल्या निसर्गाशी जवळीक आहे.

पूर्वी लहानपणी लग्न होत. काही वेळा मुलींना सासूचा जाच असे. मंगळागौरीच्या खेळांमधून घरातील नात्यागोत्यांमध्ये होणार्‍या कुरबुरी या खेळाच्या गाण्यातून मांडल्या आहेत; परंतु या गाण्याची ध्रुवपदे कायम असली, तरी त्यातील  कडवी ही महिलांनी उत्स्फूर्तपणे सिद्ध करून म्हणायची आहेत. त्यात महिलांच्या बुद्धीचा कस आहे. थोरामोठ्यांना न दुखावता खुपणार्‍या गोष्टी सांगणे, हे मोठे कौशल्याचे आहे. यातून महिलांचे बुद्धीकौशल्य, हजरजबाबीपणा, प्रेमभाव, मनमोकळेपणा, विनोदबुद्धी आदी गुणांचा कस लागतो. हिंदूंची सण-व्रते समष्टी असल्यामुळे सणांच्या निमित्ताने पाककौशल्याचा कस आहे, घरातील पाहुण्यांची व्यवस्था करावी लागल्याने नियोजनकौशल्याचा कस आहे. अनेकांना आमंत्रण असल्याने शेजार्‍यांचे संघटीकरण आणि जवळीक आहे. असो. त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींनी धर्माशी संबंधित विधाने करतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.