सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या काळात ‘उल्लास- नवभारत साक्षरता’ कार्यक्रमांची जनजागृती करावी ! – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

डॉ. सुहास दिवसे

पुणे – वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख ६७ सहस्र ८२३ इतके असाक्षर असून त्यापैकी ३ लाख ५३ सहस्र ६०२ पुरुष आणि ७ लाख १४ सहस्र २२१ इतक्या महिला आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे केंद्रशासनाने विशेष लक्ष दिले असून ‘उल्लास-नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत वर्ष २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ३८ सहस्र ८०८ असाक्षरांची ‘उल्लास ॲप’ नोंदणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आगामी गणेशोत्सव, नवरात्रीच्या काळात मंडळांनी जिल्ह्यात केंद्रपुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचा प्रचार-प्रसारच्या दृष्टीने १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून गणेशोत्सव (श्री गणेशचतुर्थी ७ सप्टेंबर) ते (अनंतचतुदर्शी १७ सप्टेंबर), तसेच नवरात्रोत्सव (३ ते १२ ऑक्टोबर) या कालावधीत सार्वजनिक मंडळानी उल्लास कार्यक्रमावर आधारित बॅनर लावणे, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी, वादविवाद, गीतगायन, सामान्य ज्ञान आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करावे.

आपल्या परिसरातील किमान ५० ते १०० असाक्षरांना शाळांच्या सहाय्याने साक्षर करण्याकरीता गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करावे. जिल्हा आणि तालुका स्तरावर अशा प्रकारे उपक्रम आयोजित करणार्‍या मंडळाना प्रशस्तीपत्र देण्यात येईल, अशीही माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिली आहे.