आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पुष्पवृष्टी करून भक्तीमय वातावरणात स्वागत

आळंदी (जिल्हा पुणे) – येथे ३० जुलैला सायंकाळी सवा ६ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदी नगर परिषद चौकात माऊलींच्या जयघोषात, वरुणराजाच्या उपस्थितीत आणि भक्तीमय वातावरणात स्वागत झाले. नगर परिषदेच्या वतीने माऊलींच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी करून माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.

माऊलींच्या पालखी स्वागतासाठी आळंदीतील वारकरी संप्रदायातील सहस्रो विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगासह ठिकठिकाणी उपस्थिती दर्शवली होती. परतीच्या या वारीत माऊलींच्या आगमनानिमित्त अनेक महिला आणि पुरुष, तसेच वारकरी विद्यार्थी फुगडी खेळतांना दिसत होते, तसेच या वारीतील भाविक हरिनामाच्या गजरात दंग झाले होते. आळंदी शहरात वारकरी भाविकांना ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक नागरिक या आगमनाच्या कार्यक्रमात सहभागी होते.