‘८.७.२०२४ या दिवशी पहाटे मला स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला दिसले, ‘सनातनच्या साधिका श्रीमती आदिती देवल यांचे देहावसान झाले आहे आणि मी त्याचे सूक्ष्म परीक्षण करत आहे.’ स्वप्नात मिळालेले ज्ञान पुढे दिले आहे. (प्रत्यक्षातही श्रीमती आदिती देवल यांचे ८ जुलै या दिवशी दुपारी २.१० वाजता देहावसान झाले.)
१. साधनेच्या तीव्र तळमळीला परिपूर्ण त्यागाची जोड दिल्यामुळे प्रारब्धावर मात करणे
श्रीमती देवल यांच्यात साधनेची तीव्र तळमळ होती. या तीव्र तळमळीला त्यांनी परिपूर्ण त्यागाची जोड दिली होती. त्याग ही २४ घंटे (तास) जगायची स्थिती आहे. जो २४ घंटे त्यागपूर्ण जीवन जगतो, त्याच्या त्यागाला ‘परिपूर्ण त्याग’, असे म्हणतात. परिपूर्ण त्याग म्हणजे साधनेसाठी गुरूंच्या चरणी अर्पण केलेले श्रम, वेळ, सुविधा इत्यादींचा विचार न करता, आहे ती स्थिती स्वीकारून जगणे. हा अध्यात्माचा महत्त्वाचा टप्पा त्यांनी साध्य केला होता.
या स्थितीत राहिल्यामुळे त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण (म्हणजे मनाच्या आणि कृतीच्या स्तरावर अध्यात्म जगणे) झाले होते. जीवनाचे अध्यात्मीकरण झाल्यामुळे त्या मृत्यूसारख्या तीव्र प्रारब्धावरही सहजतेने मात करू शकल्या. त्यांच्या प्रारब्धात ६ ते ८ महिने दुर्धर आजाराने रोगग्रस्त होऊन मृत्यू व्हायचा योग होता; पण त्यांनी त्या खडतर प्रारब्धावर साधनेने विजय मिळवला. यामुळे त्यांना दीर्घकालीन रोग न होता त्यांनी चालता-बोलता देह सोडला.
२. शेवटच्या क्षणापर्यंत साधना केल्यामुळे सहजावस्थेत देह सोडणे
जिवाची वृत्ती स्वभोगाची असली, तर त्याला अखंडपणे साधना करता येत नाही. याउलट जिवाची वृत्ती साधकत्वाची झाली, तर मायेत असतांना किंवा प्रारब्धानुसार घडणार्या कर्मातूनही त्याची साधना होते. असेच श्रीमती देवल यांच्या संदर्भातही घडले. साधकत्व ही त्यांची वृत्ती बनल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची साधना आरंभ होती. यामुळे त्या मृत्यूसारख्या खडतर प्रसंगातही सहजावस्थेत राहून देह सोडू शकल्या.
३. श्रीमती देवल यांचे प्राण विशुद्ध चक्रातून जाऊन त्यांचे मार्गक्रमण जनलोकाकडे गतीने होणे
मृत्यूच्या वेळी श्रीमती आदिती देवल सहजावस्थेत असून त्यांची साधना चालू असल्याने त्यांचे प्राण देहाबाहेर पडण्यास संघर्ष किंवा अडथळा न येता ते सहजतेने विशुद्ध चक्रातून बाहेर पडले. श्रीमती देवल यांचे प्राण साधनेच्या आध्यात्मिक ऊर्जेसमवेत देहाबाहेर पडल्यामुळे त्यांच्या लिंगदेहाचे गतीने जनलोकाकडे मार्गक्रमण चालू झाले. हा त्यांचा मृत्यूत्तर साधनाप्रवास सहजतेने होण्याचे प्रतीक होते.’
– श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा