अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शाळांना ७०४ वर्गखोल्यांची उणीव !

प्रतिकात्मक छायाचित्र

अहिल्यानगर – जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. त्यामुळे इतर खासगी शाळेतील विद्यार्थी मराठी शाळेकडे वळत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढत आहे; मात्र त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या अपुर्‍या पडत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण ७०४ वर्गखोल्या अल्प पडत आहेत. शिर्डी येथील ‘साईबाबा संस्थान’ने जिल्हा परिषदेला वर्गखोल्या बांधण्यासाठी काही कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यातून ८३ वर्गखोल्या बांधून झाल्या आहेत. दिलेल्या निधीपैकी १० कोटी रुपयांचा व्यय करणे शेष आहे. याविषयीचे वृत्त दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. तो निधी अपुरा असल्याने वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण होत नाही. वर्गखोल्यांची वाढती मागणी आणि वर्गखोल्या यांचा मेळ बसत नाही. प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील म्हणाले की, पालकमंत्री विखे-पाटील यांनी ५० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातून ३५० वर्गखोल्यांचे बांधकाम होईल. ‘साईबाबा संस्थान’च्या १० कोटी रुपयांच्या निधीतूनही बांधकाम करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही ७०४ वर्गखोल्या अल्प पडणे हे शिक्षण क्षेत्राची दुरवस्थाच दर्शवते !