संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागतासाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

जितेंद्र डुडी

सातारा, ४ जुलै (वार्ता.) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी आणि भाविक यांना वीज, पाणी, आरोग्य, सुरक्षा इत्यादी सुविधा चांगल्या प्रकारे देण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क रहावे. माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची सिद्धता लोणंद नगरपंचायत आणि प्रशासन यांच्या वतीने युद्ध पातळीवर चालू आहे. सातारा जिल्हा प्रशासन माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे ६ जुलै या दिवशी सातारा जिल्ह्यात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी स्थळ, नीरा नदी आणि पालखी मार्गाची पहाणी केल्यानंतर जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. या वेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘पालखी मार्गावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक मंगल कार्यालये, उपाहारगृहे यांचे साहाय्य घेतले जाणार आहे. तात्पुरत्या शौचालयांचीही उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे, यासाठी रांगांचे सुनियोजन करण्यात येणार आहे. पालखीतळावर २ मोठ्या स्क्रीनद्वारे सर्वांसाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शौचालयांची दुर्गंधी येऊ नये; म्हणून पावडर आणि स्प्रे यांचा उपयोग करण्यात येणार आहे. भाविकांनीही जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.’’