उतार वयातही परिपूर्ण सेवा करणार्‍या देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती उषा कदम (वय ७४ वर्षे) !

‘ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी (३.७.२०२४) या दिवशी श्रीमती उषा कदम यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (सौ.) अश्विनी पवार

श्रीमती उषा कदम यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

श्रीमती उषा कदम

१. केर काढण्यापूर्वी ध्यानमंदिरातील आसंद्या एकात एक घालून ठेवतांना जराही आवाज न येता योग्य पद्धतीने ठेवणार्‍या श्रीमती उषा कदम !

‘२२.६.२०२४ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी बसले होते. त्या वेळी श्रीमती उषा कदमकाकू या ध्यानमंदिरातील केर काढण्याची सेवा करण्यासाठी तेथे आल्या. साधकांना नामजपाला बसण्यासाठी ध्यानमंदिरात डाव्या आणि उजव्या बाजूला काही आसंद्या ठेवल्या आहेत. श्रीमती कदमकाकू ध्यानमंदिरात आल्यानंतर त्यांनी केर काढण्यापूर्वी या आसंद्या एकात एक अशा घालून ठेवल्या. त्या एकात एक आसंदी घालत असतांना एकाही आसंदीचा जराही आवाज ध्यानमंदिरात आला नाही. एवढ्या वयातही किंचित्सुद्धा आवाज होऊ न देता एकात एक आसंदी घालण्याची त्यांची योग्य पद्धत पाहिली आणि मला काकूंकडून ती पद्धत शिकायला मिळाली.

२. केर काढल्यानंतर ध्यानमंदिरातील फरशी पुसल्याप्रमाणे स्वच्छ वाटणे

त्यानंतर त्यांनी पंखा बंद करून केर काढला. काकूंनी केर काढल्यानंतर ध्यानमंदिरातील फरशी पुसल्याप्रमाणे स्वच्छ वाटत होती. धूळ किंवा जराही कचरा फरशीवर दिसत नव्हता.

श्रीमती कदमकाकू यांच्यामधील ‘इतरांचा विचार करणे, परिपूर्ण सेवा करणे’, हे गुण मला शिकायला मिळाले’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– (पू.) सौ. अश्विनी अतुल पवार, (सनातनच्या ९ व्या (समष्टी) संत,) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.६.२०२४)