नवदुर्गापैकी एक असलेल्‍या प्रसिद्ध श्री कात्‍यायनीदेवीच्‍या मंदिरात चोरी : ५ किलो चांदीची प्रभावळ चोरीस !

श्री कात्‍यायनीदेवी मंदिर

कोल्‍हापूर – जिल्‍ह्यातील अत्‍यंत महत्त्वाच्‍या अशा नवदुर्गांपैकी एक असलेल्‍या श्री कात्‍यायनीदेवीच्‍या मंदिरात चोरी झाली. चोरट्यांनी पहाटे मंदिरातील मुख्‍य द्वारांची कुलपे तोडून ५ किलो चांदीची प्रभावळ चोरून नेली आहे. या संदर्भात करवीर पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट करण्‍यात आली असून पोलीस अन्‍वेषण करत आहेत. याचे साधारण मूल्‍य ५ लाख रुपयांपर्यंत असण्‍याची शक्‍यता आहे. हे मंदिर अत्‍यंत प्राचीन असून येथे भगवान परशुरामाने तप:श्‍चर्या केली होती आणि त्‍याच्‍या नावाचे पाण्‍याचे कुंडही मंदिर परिसरात आहे. वर्ष २०१८ मध्‍येही या मंदिरात चोरट्यांनी पंचारती, देवीचे २ मुकूट आणि चांदीचे दागिने यांची चोरी केली होती; मात्र नंतर पोलिसांच्‍या अन्‍वेषणात हे सर्व सापडले होते. गेली अनेक वर्षे मंदिराचे पुजारी श्री. रामचंद्र विष्‍णु गुरव हे त्‍यांच्‍या कुटुंबियांसह याच परिसरात रहातात आणि अत्‍यंत भक्‍तीभावाने देवीची सेवा करतात.

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात मंदिर चोरीच्‍या घटनांमध्‍ये वाढ !

गत महिन्‍यात कोल्‍हापूरचे ग्रामदैवत असलेल्‍या कपिलेश्‍वर महादेव मंदिरात चोरी झाली आहे. चोरट्याने पाऊण किलो चांदीचा मुखवटा, तांब्‍याचे अभिषेकपात्र, नंदादीप, तसेच पूजेचे अन्‍य साहित्‍य अशा पाऊण लाख रुपयांच्‍या साहित्‍याची चोरी केली होती. यांसह जिल्‍ह्यातील अन्‍य काही मंदिरांमध्‍येही चोरीच्‍या घटना गेल्‍या काही दिवसांत झाल्‍या आहेत. (मंदिरांमध्‍ये चोरीच्‍या घटना वाढत असूनही पोलीस प्रशासन निष्‍क्रीय का आहे ? अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांच्‍या संदर्भात अशा घटना कधी घडल्‍यास पोलीस शांत बसतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

महाराष्‍ट्रात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !