शाळेच्या पहिल्याच दिवशी कांदळगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शाळेचे छप्पर कोसळले !

  • वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक नसल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला !

  • शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप

मालवण – नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ १५ जून या दिवशी झाला. शाळेच्या या पहिल्याच दिवशी तालुक्यातील ‘कांदळगाव परबवाडा क्रमांक २’ या जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर थोड्याच वेळात शाळेचे अर्धे छप्पर कोसळले. सुदैवाने छप्पर कोसळलेल्या भागातील वर्गात मुले आणि शिक्षक नसल्याने मोठा अनर्थ टळला. असे असले, तरी शाळेच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणार्‍या शिक्षण विभागाच्या कारभाराच्या विरोधात ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

छप्पर कोसळल्याने शाळेतील कपाट, पंखा, विद्युत् जोडणी आणि इतर साहित्य यांची मोठी हानी झाली आहे. शाळेचे छप्पर कोसळल्याचे समजताच ग्रामस्थ आणि पालक यांनी कोसळलेले छप्पर बाजूला करण्यासाठी सहकार्य केले. सरपंच रणजित परब, तलाठी शिंदे, पोलीस पाटील शीतल परब, ग्रामसेवक सागर देसाई, तसेच शिक्षण विभागाच्या वतीने केंद्रप्रमुख बागवे यांनी शाळेला भेट देऊन पहाणी केली.

शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे छप्पर कोसळल्याचा ग्रामस्थांचा आरोप

या शाळेच्या छप्पराची दुरवस्था झालेली असल्यामुळे गेली २ वर्षे ग्रामस्थ, तसेच शिक्षक यांच्याकडून शाळेच्या दुरुस्तीकडे शिक्षण विभागाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले. शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवूनही त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

संपादकीय भूमिका 

याला उत्तरदायी असणार्‍या शिक्षण विभागातील संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, म्हणजे पुढे अशा गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असेच जनतेला वाटते !