एस्.टी. प्रशासनाने अपघाताची गंभीर नोंद न घेतल्याने कुडाळ आगाराच्या कर्मचार्‍यांचे ‘काम बंद’ आंदोलन !

  • विजापूर येथील अपघातात कुडाळ एस्.टी. आगारातील २ कर्मचारी घायाळ झाल्याचे प्रकरण

  • संबंधितांवर कारवाई न झाल्यास आजपासून एकही गाडी आगारातून सुटणार नसल्याची चेतावणी

  • २ घंट्यांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत

कुडाळ – कर्नाटक राज्यातील विजापूर आगारामध्ये १२ जूनला रात्री झालेल्या अपघातात कुडाळ एस्.टी. आगाराचे वाहक आणि चालक, असे दोघे गंभीर घायाळ झाले.  या अपघाताला ३ दिवस होऊनही एस्.टी. प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्याच्या निषेधार्थ १४ जूनला दुपारी २ वाजता कुडाळ आगाराच्या कर्मचार्‍यांनी अचानक ‘काम बंद’ आंदोलन केले. त्यानंतर आगार व्यवस्थापक, कर्मचारी संघटना आणि पोलीस यांच्यात चर्चा होऊन दुपारी ४ वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. ‘या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्याची प्रत १४ जूनला रात्रीपर्यंत न मिळाल्यास १५ जूनला पहाटेपासून कुडाळ आगारातून एकही गाडी बाहेर पडणार नाही’, अशी चेतावणी एस्.टी. कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी या वेळी प्रशासनाला दिली. २ घंटे चाललेल्या या आंदोलनामुळे एस्.टी.च्या गाड्यांचे वेळपत्रक कोलमडल्यामुळे प्रवाशांची असुविधा झाली.

१२ जूनला सकाळी चालक सतीश रमेश मांजरेकर (रहाणार गांधीनगर, कुडाळ) आणि वाहक सचिन गणपत रावले (रहाणार निवती, वेंगुर्ला) हे दोघे कुडाळ-विजापूर बस घेऊन रात्री १० वाजता विजापूर आगारात पोचले. तेथे उभे असतांना विजापूर आगारात बसची चाचणी करणार्‍या मॅकेनिकचे नियंत्रण सुटल्याने बसने मांजरेकर आणि रावले यांना धडक दिली. या अपघातात मांजरेकर खाली पडल्याने त्यांच्या एका पायावरून चाक गेल्याने तो पाय निकामी झाला, तर रावले यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. या दोघांवर विजापूर येथील भारती रुग्णालयात उपचार चालू आहेत. एवढी गंभीर घटना घडूनही कुडाळ येथील एस्.टी. प्रशासनाने कोणतीही नोंद न घेतल्याने संतप्त कामागारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष करणारे आगार प्रमुख पाटील यांना या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि एस्.टी. कामगार संघटनेचे नाईक यांनी चांगलेच खडसावले.