जुन्नर येथील चावंड गडावर आढळल्या ऐतिहासिक वस्तू !

चावंड गडावर आढळलेल्या ऐतिहासिक वस्तू

जुन्नर – येथील चावंड उपाख्य प्रसन्नगड येथे दुर्ग संवर्धन मोहिमेत मरहट्टे सह्याद्रीचे या दुर्ग संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांना ऐतिहासिक वस्तू आढळल्या. यामध्ये एक महाकाय तोफ, तोफ गोळा, तसेच ब्रिटीशकालीन बंदुकीचे बॅरल सदृश पाईप आणि लाकडी अवशेष मिळाल्याचे संस्थेचे अमोल ढवळे यांनी सांगितले. चावंड येथील ऐतिहासिक पुष्करणी गाळमुक्त करण्याचे काम करतांना या पुरातन वस्तू मिळाल्या असून त्या जुन्नर वनविभागाकडे सुपूर्द केल्या आहेत. ‘शिवाजी ट्रेलर’ या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मरहट्टे सह्याद्रीचे आणि दुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने चावंड येथे ‘दुर्ग संवर्धन मोहीम’ राबवण्यात येत आहे. पुष्करणी गाळमुक्त करण्याच्या उपक्रमात मरहट्टे सह्याद्री आणि दुर्गोत्सव यांचे एकूण ३० सदस्य उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून संवर्धनाच्या कार्यास प्रारंभ झाला. इतिहासाचे अभ्यासक श्री. विनायक खोत यांनी शिवराज्याभिषेक या विषयावर दुर्ग संवर्धकांना मार्गदर्शन केले.