अलमट्टी प्रकल्प अधीक्षकांचे कृष्णा नदी महापूर नियंत्रण समिती पदाधिकार्यांना आश्वासन !
सांगली, १४ जून (वार्ता.) – कृष्णा खोर्यातील महापूर रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधार्यामधील (बॅरेज) पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांनी दिले.
कृष्णा खोर्याला बसणारा महापुराचा तडाखा रोखण्यासाठी काही वर्षे ‘कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती’च्या वतीने प्रयत्न चालू आहेत. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधार्यामधील पाणीसाठा आणि त्या दोन्हीही साठ्यांचे परिचलन व्यवस्थित होत नसल्याची सातत्याने तक्रार आहे. त्यामुळेच महापुराचा धोका उद्भवतो, असेही निष्कर्ष आहेत. या पार्श्वभूमीवर समितीद्वारे अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज यांचा पहाणी दौरा झाला. समितीच्या पदाधिकार्यांच्या समवेत अलमट्टी प्रकल्पाचे (कर्नाटक जलसंपदा विभाग) अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांनी चर्चा केली. या वेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत महापूर येऊ नये, यांसाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
हिप्परगी बॅरेजचे दरवाजे पावसाळ्यात खुले रहाणार !‘महापूर टाळण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे दरवाजे जून महिन्यात उघडले पाहिजेत आणि ते ३० ऑगस्टपर्यंत खुले राहिले पाहिजेत’, असे समितीने सांगितले. त्यावर या अधिकार्यांनी ते मान्य करत ‘ते दरवाजे आता खुले ठेवू’, असे सांगितले. हिप्परगी बॅरेजचे दरवाजे खुले ठेवले आहेत, असे समितीला आढळले. |