|
पुणे – येथील बावधन परिसरामध्ये २००७ या वर्षी ‘नॅन्सी ब्रह्मा सोसायटी’च्या ७१ सदनिकाधारकांची वाहनतळ जागा (पार्किंग), अॅमिनीटीची (सुविधांची) जागा, मोकळी जागा देणे बंधनकारक असतांना एकाच जागेवर ३ सोसायटी (वसाहत) सिद्ध केल्या. एकच अॅमिनीटीज् (सुविधा) आणि मोकळी जागा दाखवून सदनिकाधारकांची अनुमती नसतांना ‘वॅन्टेज टॉवर’ ही ११ मजली आणि ‘वॅन्टेज हाय’ ही १० मजली इमारत बांधून फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात कल्याणीनगर ‘पोर्शे’ अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह ५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी विशाल अडसूळ यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे.
वर्ष २००७ मध्ये बावधन येथे बांधण्यात आलेल्या ‘नॅन्सी ब्रह्मा को-ऑप. हौसिंग सोसायटी’मध्ये ७१ जणांनी सदनिका (फ्लॅट) घेतली होती. याच सोसायटीच्या मालकीची वाहनतळ आणि इतर सुविधा यांची जागा, तसेच मोकळी जागा आहे; मात्र एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशांवर दाखवून नकाशामध्ये फेरपालट करून तसे नकाशे संमत करून घेतले.
‘नॅन्सी ब्रह्मा सोसायटी’च्या सभासदांची कोणतीही अनुमती नसतांना विकासक विशाल अग्रवाल यांच्यासह इतर साथीदारांनी संगनमत करून सोसायटीच्या जागेवर ‘वॅन्टेज टॉवर’ या ११ मजली इमारतीमध्ये ६६ कमर्शियल (व्यावसायिक) ऑफिस बांधले आणि ‘वॅन्टेज हाय’ या इमारतीमध्ये २७ सदनिका आणि १८ दुकान गाळे बांधून येथील सदनिकाधारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे.