विवेकी व्यक्तीकडूनच बुद्धीचा सकारात्मक वापर होतो ! – भैय्याजी जोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

‘ज्ञानसागर महाप्रकल्पा’च्या १ सहस्र ५१ ग्रंथांचे लोकार्पण

ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १ सहस्र ५१ ग्रंथांच्या लोकार्पणप्रसंगी ग्रंथांना नमस्कार करतांना भैय्याजी जोशी, शेजारी इंदुमतीताई काटदरे, तसेच अन्य मान्यवर

लातूर – मानवाकडे केवळ बुद्धी असून चालत नाही, तर विवेकही असावा लागतो. विवेकानुसार वागणारी व्यक्ती बुद्धीचा सकारात्मक वापर करते. मन सकारात्मक आणि परिपूर्ण असावे, यासाठी मार्गदर्शन देण्याचे काम ग्रंथांच्या माध्यमातून केले जाते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.

भारतीय शिक्षणावर आधारित ज्ञानसागर महाप्रकल्पाच्या १ सहस्र ५१ ग्रंथांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम दयानंद सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास पुनरुत्थान विद्यापिठाच्या कुलपती श्रीमती इंदुमतीताई काटदरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांताचे संघचालक श्री. अनिल भालेराव, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य, ‘राजा नारायणलाल लाहोटी विद्यालया’चे अध्यक्ष श्री. आनंद लाहोटी हे व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे उपस्थित होते.

पुनरुत्थान विद्यापिठाच्या कुलपती श्रीमती इंदुमतीताई काटदरे म्हणाल्या, ‘‘एकविसाव्या शतकात भारताला कुठल्या प्रकारचे शिक्षण हवे आहे, त्याचा विचार करून विद्यापीठ कार्यरत आहे. त्यासाठी ६० वर्षांची कार्य योजना सिद्ध केली आहे. भारतीय विद्या आणि ज्ञान देणारे शिक्षण मिळण्यासाठी संशोधन आवश्यक आहे.’’