उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील तक्रारीवर कारवाई करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

  • मतदानप्रक्रिया चालू असतांना पत्रकार परिषद घेतल्याचे प्रकरण !

  • आशिष शेलार यांनी केली होती तक्रार !

मुंबई – ‘मुंबईतील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी आहे; मात्र जिथे शिवसेनेची (म्हणजे ठाकरे गटाची) मते आहेत, तिथे मतदान प्रक्रिया संथगतीने चालू आहे. निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींकडून दिरंगाई केली जात असून त्याचा त्रास मतदारांना त्रास होत आहे’, असे विधान ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया चालू असतांनाच पत्रकार परिषद घेऊन पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदान चालू असतांना केले.

या पत्रकार परिषदेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची नोंद घेऊन राज्य निवडणूक आयोगाने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. आचारसंहिता भंग झाल्याचे सिद्ध झाले, तर ठाकरे यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद होऊ शकतो.