China : अमेरिकेची ‘एशिया पॅसिफिक’ रणनीती विभाजन आणि संघर्ष यांना प्रोत्साहन देणारी ! – चीन

लेफ्टनंट जनरल जिंग जियानफेंग

सिंगापूर – अमेरिकेची ‘एशिया पॅसिफिक’ (‘एशिया-पॅसिफिक’ प्रदेशात हिंद महासागर, पश्‍चिम आणि मध्य पॅसिफिक महासागर, तसेच दक्षिण चीन समुद्र यांचा समावेश आहे) रणनीती विभाजन आणि संघर्ष यांना प्रोत्साहन देणारी आहे, अशी टीका चीनच्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’च्या ‘जॉइंट स्टाफ’ विभागाचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल जिंग जियानफेंग यांनी केली. ‘शांग्री ला डायलॉग’ या आशियातील प्रमुख संरक्षण परिषदेत बोलतांना अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी ‘एशिया-पॅसिफिक क्षेत्रात भागीदारी वाढवणे आणि सहकार्य मजबूत करणे’, यांवर अमेरिकेचा भर आहे, असे वक्तव्य केले होते. त्या प्रत्युत्तर देतांना जियानफेंग यांनी वरील टीका केली.

जियानफेंग पुढे म्हणाले, ‘‘अमेरिका ‘नाटो’ची (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ची ) ‘एशिया-पॅसिफिक’ आवृत्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. ऑस्टिन यांची टिपणी ही केवळ अमेरिकेचे भू-राजकीय हितसंबंध जपण्यासाठी असून ती कदापि यशस्वी होणार नाही. या संपूर्ण धोरणाचा उद्देश ‘एशिया पॅसिफिक’वर अमेरिकेचे वर्चस्व कायम राखणे, हा आहे.’’

काय आहे ‘नाटो ?’

‘नाटो’ (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) ही अनेक देशांच्या सैन्यदलांची एक युती आहे. यामध्ये ३२ देश सहभागी असून ३० देश युरोपीय आणि दोन उत्तर अमेरिकन आहेत. ‘नाटो’च्या कोणत्याही सदस्य राष्ट्रावर आक्रमण हे संपूर्ण ‘नाटो’ आघाडीवर आक्रमण मानले जाते आणि सर्व सदस्य देश त्या आक्रमणाला एकत्रितपणे प्रत्युत्तर देतात.