पुण्यात झालेल्या ‘पोर्शे’ कारच्या अपघातातून काही शिकणार का ?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एक अपघात झाला. त्याची चर्चा सगळीकडे चालू आहे. प्रतिदिन नवनवीन गोष्टी त्यासंबंधी उघड होत आहेत. यात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यू झाला. तो अपघात एका अल्पवयीन मुलाकडून झाला. त्याला काही दिवसांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

१. दुसर्‍या बाजूचाही विचार हवा !

कु. अन्नदा मराठे

असे कित्येक अपघात प्रतिदिन होत असतात; पण या मुलाची लगेच जामिनावर झालेली सुटका आणि त्याला प्रारंभी सुनावण्यात आलेल्या शिक्षांमुळे या अपघाताची चर्चा चालू झाली. या संपूर्ण घटनेत ‘मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला’, अशीही चर्चा चालू आहे. अनेक जण यात राजकीय हस्तक्षेप असल्याविषयीसुद्धा बोलत आहेत; मात्र या प्रकरणाला असलेल्या दुसर्‍या बाजूचा विचार पुष्कळ अल्प प्रमाणात होतांना दिसत आहे.

२. गुन्हे करणार्‍यांना कुणाचा तरी थोडा धाक आहे का ?

पुणे पोर्श काऱ अपघात प्रकरण

एक अल्पवयीन मुलगा मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत एका महागड्या आणि नोंदणीकृत नसलेल्या ‘पोर्शे’ गाडीमध्ये बसून तरुण-तरुणीला धडक मारून उडवतो. एवढीच ही घटना मर्यादित नाही. सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न हा येतो की, अल्पवयीन मुलाला ‘पब’मध्ये प्रवेश कसा काय मिळाला ? तो इतका वेळ तेथे होता, ही गोष्ट कुणाच्याच कशी लक्षात आली ? मध्यरात्री तो चालवत असलेली नोंदणीकृत नसलेली ‘पोर्शे’ गाडी कुणाच्याच लक्षात आली नाही का ? अशा पद्धतीचे वर्तन करणार्‍या मुलाला अल्पवयीन कसे म्हणता येईल ?

३. अन्य दोघांचाही विचार करायला हवा !

यात चूक जेवढी त्या मुलाची आहे, तेवढीच चूक त्या तरुण-तरुणीची नाही का ? ते दोघे इतक्या रात्री कुठून येत होते ? ते कुठून कामावरून किंवा समारंभातून परत येत होते का ? तसे जर असेल, तर त्यांची चूक नाही, हे आपण मान्य करू शकतो; पण तेही जर अशाच एखाद्या पार्टीमधून येत असतील, तर त्यांनीही मद्यपान किंवा अन्य अमली पदार्थ घेतलेले नव्हते ना ? याचाही विचार व्हायला हवा.

४. समाजात पालटत असलेली मानसिकता धोकादायक !

मूळ प्रश्न तो अल्पवयीन मुलगा किंवा त्या तरुण-तरुणीचा नाही, तर समाजाच्या पालटत असलेल्या मानसिकतेचा आहे. सध्याचा आपला समाज आणि विशेष करून तरुण पिढी एका वेगळ्या वाटेवर वेगाने निघालेली आहे. वेगाने होत असलेले पाश्चात्त्यीकरण याला कारणीभूत आहे. ज्याकडे आपला समाज संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. रात्रभर जागून मेजवानी (पार्टी) करणे, दारू आणि अमली पदार्थ घेणे, कुठलीही चांगली गोष्ट घडली की, पबमध्ये जाऊन ती साजरी करणे, याला आज एका वेगळ्या नजरेमधून पाहिले जात आहे. अशा प्रकारे जर कुणी वागले नाही, तर त्याला बुरसटलेला किंवा जुन्या मानसिकतेचा म्हणून बाजूला केले जाते. आज अगदी शाळा किंवा महाविद्यालये यांमधूनही याच विकृतीला प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे आनंद वेगळ्या प्रकारेही साजरा केला जाऊ शकतो ? हे आज तरुण पिढीला मान्य होईनासे झाले आहे.

तो अल्पवयीन मुलगाही १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे ‘पब’मध्ये आला होता, असे आता समोर आले आहे. अशा पद्धतीच्या पार्ट्यांमधून पुष्कळ प्रमाणात अमली पदार्थ विकले जातात. ज्याचा वाईट परिणाम मानवी शरिरावर होत असतो. याखेरीज अनेक अवैध गोष्टींना अशा पद्धतीच्या पार्ट्यांमधून चालना मिळत असते.

५. पार्ट्या आणि नशा ही आपली संस्कृती नाही !

आणखी एक सूत्र या घटनेमुळे चर्चेला आले आहे ते, म्हणजे उच्च मध्यमवर्गीय समाजाच्या मानसिकतेचे. मला असे वाटते की, गुन्हेगारी वृत्ती ही घर किंवा पैसे बघून जन्माला आलेली नसते, तर ती एक प्रवृत्ती असते. अनेक प्रकारचे गुन्हे हे अगदी गरीब घरातून आलेली मुलेही करत असतात. अनेक झोपडपट्ट्या यासाठी कलंकित आहेत.

या संपूर्ण घटनेतून पालटत चाललेली संस्कृती दिसून येत आहे. पाश्चात्त्य विकृतीचा आपल्या संस्कृतीवर वाढत चाललेला प्रभाव आणि त्यामुळे समाजाचा पालटत चाललेला कल, ही पुष्कळ महत्त्वाची गोष्ट आहे. रात्रभर चाललेल्या पार्ट्या, नशेच्या आधीन होत चाललेली तरुण पिढी, ही आपली संस्कृती नाही. आपल्या संस्कृतीला स्वतःचा एक विचार आहे. म्हणूनच इतकी आक्रमण होऊनही ती टिकून राहिली; मात्र आज तोच विचार संपवून टाकण्याचा घाट काही लोक करत आहेत. हा संपूर्ण विचारच कसा चुकीचा आहे ? हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट कशी जुनी, बिनकामाची आणि चुकीची आहे ? हे आपल्या मनावर बिंबण्याच्या प्रयत्न आज प्रत्येक माध्यमातून होत आहे. याला रोखण्याची आवश्यकता आहे; कारण आपली संस्कृती ही एका पुष्कळ महान विचारावर उभी आहे आणि तोच जर चुकीचा आहे, असे जर आपल्याला वाटायला लागले, तर इतर अनेक संस्कृतीप्रमाणे आपल्या महान आणि दिव्य अशा संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात यायला वेळ लागणार नाही.

– कु. अन्नदा विनायक मराठे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.