Goa Water Resources : गोव्यातील धरणांत २ मास पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

गोव्यातील साळावली धरण

पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) : राज्यातील धरणांमध्ये पुढील २ मास पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा असून चिंतेचे कारण नाही, अशी आश्वासक माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. ‘साळावलीसह राज्यातील ४ जलाशयांतील पाण्याची पातळी निम्म्याहून खाली उतरली आहे आणि यामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यास पाण्याची समस्या निर्माण होईल कि काय ?’, असे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी हे स्पष्टीकरण दिले.

शिरोडकर पुढे म्हणाले,

‘‘राज्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. साळावली धरणात ११ सहस्र ७८५ हेक्टर मीटर पाणी असून ते पुढील १३० दिवस पुरेल एवढे आहे. या धरणातून आम्ही प्रतिदिन ९० हेक्टर मीटर पाणी घेतो. तिलारी धरणात १२ सहस्र ५६७ हेक्टर मीटर पाणी आहे आणि या धरणातून प्रतिदिन १५६ हेक्टर मीटर पाणी आम्ही घेतो. त्यामुळे पुढील १४४ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात आहे. चापोली धरणात ४६० दिवस पुरेल एवढा पाठीसाठा आहे. या ठिकाणचे पाणी अधिक वापरले जात नाही. सत्तरीतील अंजुणे धरणात ७० दिवस पुरेल एवढे पाणी आहे. आमठाणे धरणात ‘पंपिग स्टेशन’ असल्याने तेथे कमी-अधिक प्रमाणात पाणी असते. ही सर्व स्थिती पहाता २ मासांनंतरही १० ते १५ दिवस पाणी पुरेल एवढा साठा आहे. पंचवाडी धरणात १२७ दिवस पुरेल एवढे पाणी आहे. या धरणातून प्रतिदिन ५० ते ८० लक्ष लिटर पाणी घेतले जाते. गेल्या वर्षी २४ जूनपर्यंत पंचवाडी धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता आणि यामुळे हे धरण आटले होते; परंतु यंदा स्थिती समाधानकारक आहे. यामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यासही चिंतेचे कारण नाही. गेल्यावर्षी जून मासाच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मौसमी पावसाचे आगमन झाले होते.

(सौजन्य : prime media goa)

कालव्यांमधून सिंचनासाठीचे पाणी १५ मेपासून बंद करणार !

अंजुणे किंवा इतर धरणांमधून भातशेतीसाठी कालव्यांद्वारे सिंचनासाठी दिले जाणारे पाणी हळूहळू अल्प करून ते १५ मे या दिवशी बंद केले जाणार आहे. या हंगामातील भातशेतीची कापणी साधारणपणे २० ते ३० एप्रिलपर्यंत पूणे होते आणि त्यामुळे शेतकर्‍यांना त्यानंतर पाणी लागत नाही, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.