भाजपमध्ये या अन्यथा ईडीच्या कारवाईतून कारागृहात पाठवू !

आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांचा त्यांना धमकी मिळाल्याचा दावा

आपच्या नेत्या आतिशी मार्लेना

नवी देहली – देहलीच्या मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना यांनी २ एप्रिल या दिवशी पत्रकार परिषद घेऊन केंद्रशासनाच्या विरोधात गंभीर दावे केले आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्या जवळच्या व्यक्तीकडून मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्क साधण्यात आला. ‘राजकीय कारकीर्द वाचवा अन्यथा कारागृहात जाण्याची सिद्धता ठेवा’, असे मला सांगण्यात आले, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की…

१. मला सांगण्यात आले होते की, येत्या काळात माझ्या आणि माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडी छापे घालणार आहे. त्यानंतर लवकरच आम्हाला अटक करण्यात येईल.

२. माझ्याखेरीज आपचे खासदार राघव चढ्ढा, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक यांनाही अटक करण्याची सिद्धता चालू आहे.

३. ईडीने काल माझे आणि सौरभ भारद्वाज यांचे नाव न्यायालयात घेतले.

४. केजरीवाल, सिसोदिया, संजय सिंह, सत्येंद्र जैन कारागृहात असूनही आमचा पक्ष सशक्त असल्याचे भाजपला वाटते. आता ते पुढच्या फळीतील नेतृत्वाला कारागृहात टाकण्याच्या सिद्धतेत आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारतीय लोकशाही आणि तिच्या अन्वेषण यंत्रणा केंद्रशासनाच्या हातचे बाहुले झाले आहे, अशी ओरड आप, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष करत असतात. यातील तथ्य एक दिवस सर्वांसमोर येईल; परंतु या माध्यमातून आपवाले भारताची जगात नाचक्की करत आहेत. त्यांना निवडणुकीत याचा फटका बसल्यास आश्‍चर्य वाटू नये !