महाराष्‍ट्र शासन करणार महाराष्‍ट्राच्‍या बाहेर मराठीचा प्रचार !

मुंबई, १३ जुलै (वार्ता.) – महाराष्‍ट्र आणि महाराष्‍ट्राच्‍या बाहेर मराठीचा प्रचार-प्रसार करण्‍यासाठी शासन ५०० मराठी भाषा युवक मंडळे स्‍थापन करणार आहे. या मंडळांना राज्‍यशासनाकडून प्रतिवर्षी १० सहस्र रुपये इतके अनुदान दिले जाईल. याविषयी १३ जुलै या दिवशी शासनाने आदेश काढला आहे.

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे, ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’, ‘मराठी भाषा गौरवदिन’, तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करणे, राज्‍यातील नामवंत साहित्‍यिक, विचारवंत, कवी यांची व्‍याख्‍याने अन् परिसंवाद यांचे आयोजन करणे आदी उपक्रम मंडळांना राबवावे लागतील. मंडळांमध्‍ये अन्‍य भाषिकांनाही समाविष्‍ट करून घेता येणार आहे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील व्‍यक्‍तींना या मंडळात घेता येणार आहे. ही मंडळे संस्‍कृती, कला, साहित्‍य, विज्ञान, वाणिज्‍य, उद्योग आणि क्रीडा आदी क्षेत्रांत मराठी भाषेतून कार्यरत असणे आवश्‍यक आहे.