भाजप नेत्‍या पंकजा मुंडे २ मास राजकारणापासून अलिप्‍त रहाणार !

भाजपच्या पंकजा मुंडे

मुंबई – मी ज्‍या भाजपमध्‍ये वाढले, ज्‍या संस्‍कारांत वाढले, त्‍याच्‍याशी प्रतारणा करावी लागली, तर मी राजकारणातून संन्‍यास घ्‍यायलाही मागे-पुढे पहाणार नाही. आज बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, पवारांची राष्‍ट्रवादी राहिली नाही, उद्या दिनदयाळ उपाध्‍याय आणि अटलजी यांची भाजप रहाण्‍यासाठी आपण सगळ्‍यांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. आताच्‍या परिस्‍थितीत मला सुटीची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे मी २ मास सुट्टी घेऊन अंतर्मुखतेने विचार करणार आहे, असे भाजप नेत्‍या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी म्‍हटले आहे. सध्‍याच्‍या राजकीय घडामोडींच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजप नेत्‍या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्‍यांच्‍या काँग्रेसमध्‍ये जाण्‍याविषयी चालू असलेल्‍या चर्चेवर प्रहार करत त्‍या म्‍हणाल्‍या की, मी कधी राहुल गांधी यांना भेटलेलीही नाही. माझे जे काही आहे, ते पारदर्शक आणि प्रामाणिक आहे. मी नाराज नाही; पण दुःखी आहे. दोनदा विधानसभेत मला संधी दिली नाही; पण मी पक्षाचा आदेश मान्‍य केला.