समंजस, प्रेमळ आणि लहान वयातही दायित्वाने वागणारी देवद येथील सनातनच्या आश्रमातील ५२ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी फाटक (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. कल्याणी फाटक ही या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

कु. कल्याणी फाटक

१. खाऊ किंवा खेळणी यांसाठी हट्ट न करणे

‘कल्याणी लहान असतांना तिला कधी खाऊ हवा असल्यास ती मला ‘खाऊ आणशील का ?’, असे विचारायची. तिने ‘एखादी गोष्ट (खाऊ किंवा खेळणी) हवीच आहे’, असा हट्ट कधी केला नाही.

२. निर्मळ मन

ती जितकी पटकन रागावते, तितक्याच पटकन तिचा राग शांतही होतो. ती लगेच बोलायला येते.

३. समंजस

मी कामावरून घरी आले की, कल्याणी माझ्या हातातील ‘पर्स’ आणि पिशवी घेत असे. माझ्या चपला खणात ठेवत असे. ती माझ्या हातात पाण्याचा पेला देत असे आणि नंतर रिकामा पेला ओट्यावर नेऊन ठेवत असे. वास्तविक या गोष्टी मी तिला सांगितलेल्या किंवा शिकवलेल्या नाहीत. ती स्वतःहून या गोष्टी करत असे. ती म्हणायची, ‘‘आई तू दमतेस ना. तू प्रतिदिन सकाळी किंवा दुपारी जातेस आणि रात्री येतेस. मग मी एवढे नको का करायला ?’’ मी कधी कधी तिला विचारायचे, ‘‘तू स्वतःहून कशी काय करतेस एवढे ?’’ तेव्हा ती म्हणायची, ‘‘तू आमचे लाड करतेस, खाऊ आणतेस, जेवायला करतेस, आम्हाला हवे ते देतेस, आमचा अभ्यास घेतेस. मग आम्ही नको का काही करायला ? आमचेही काही दायित्व आहे कि नाही ?’’

सौ. श्रावणी फाटक

४. देवाप्रती भाव

अ. ती देवाची पूजा मनोभावे करते.

आ. तिने भातुकली खेळतांना स्वयंपाक केला की, ती देवाला नैवेद्य दाखवते. तिची स्वयंपाक करण्याची कल्पना आणि ते पदार्थ करण्यामागचा भाव माझी पुष्कळ भावजागृती करणारा असतो.

५. दुसर्‍यांच्या मनातील जाणणे

ती घराच्या सज्जात खेळते. मी बाहेरच्या खोलीत असतांना मला वाचण्यासाठी चष्मा हवा असेल, तर माझ्या मनातील जाणून ती न सांगता चष्मा आतून आणून माझ्या हातात देत असे. असे अनेक वेळा झाले आहे.

६. मोठ्या माणसांप्रमाणे अंदाज घेऊन तारतम्याने वागणे

घराबाहेर पडतांना ऊन-पावसाचा अंदाज घेऊन छत्री, टोपी घेणे, रेल्वेस्थानकावर जाणार असू, तर काही अधिकचे घेणे होईल, ते ठेवण्यासाठी किंवा ‘पैसे अल्प पडले, तर’ याचा विचार करून अधिकची पिशवी, स्वतःची पर्स घेणे, अशा गोष्टी ती मोठ्या माणसाप्रमाणे करत असे.

७. कल्याणीत असलेले गृहिणीप्रमाणे गुण

एखाद्या गृहिणीत असलेले ‘सहनशीलता, कुटुंबियांची जेवणासाठी वाट पहाणे, मला किंवा तिच्या बाबांना घरी यायला उशीर झाला, तर भ्रमणभाष करणे, आजीला औषधे देणे, आजी औषधे घ्यायला विसरल्यास प्रेमाने सांगणे, घरातील व्यक्तींची ‘आवड-नावड’ यांचा विचार करणे, निःस्वार्थ भावनेने इतरांना साहाय्य करणे, तारतम्य, प्रसंगावधान, संवेदनशीलता, धीटपणा, परिपक्वता, समजूतदारपणा, दुसर्‍याचा विचार करणे’ हे सद्गुण कल्याणीत आहेत’, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे.

८. आई रुग्णाइत असतांना दायित्वाचे भान असणारी कल्याणी !

ऑगस्ट २०२० मध्ये मला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे मी ५ दिवस रुग्णालयात होते. त्या दिवसांत कल्याणीने ‘मॅगी, पोहे’ असे पदार्थ खाल्ले. कल्याणीच्या मैत्रिणीच्या आईने तिला बिस्किटे आणि कोरडा खाऊ आणून दिला होता. तो तिने पुरवून खाल्ला. मी घरी आल्यावर १० दिवस जेवणाचा डबा लावला होता. ‘घराखालून डबा आणणे, मला हवे ते वाढणे, स्वतःला हवे ते वाढून घेणे, स्वतःला हवे असेल, ते रात्रीसाठी काढून ठेवणे, बाबांना वाढणे, रिकामा डबा घासणे आणि तो पुसून पिशवीत भरून दुसर्‍या दिवशी परत करणे’, हे सगळे ती व्यवस्थित करत होती. ती कोरोना प्रतिबंधक सर्व सूचनांचे पालनही करत होती. त्या वेळी मी, कल्याणीचे बाबा आणि कल्याणी आम्ही तिघे जण ३ खोल्यांत रहात होतो. कल्याणी एकटीच तिचे मन रमवत होती. तिला १४ – १५ दिवस असे रहावे लागले.

९. कल्याणीने केलेले भविष्यकथन सत्यात उतरणे

अ. तिने भविष्यात घडणार्‍या ३ – ४ घटनांविषयी सांगितले, ‘‘मला चीन दिसतोय; पण लाल झेंडा नाही. पाकिस्तान दिसतोय; पण हिरवा झेंडा नाही. अमेरिका दिसते; पण पांढर्‍या केसांची वयस्कर व्यक्ती (ट्रम्प) नाही.’’ कालांतराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हरले.’ (२९ ऑगस्ट २०२०)

आ. तिने दुसरा प्रसंग सांगितला, ‘‘चीन आणि पाकिस्तान या देशांत सगळीकडे पाणीच पाणी होणार आहे. तिने ज्या दिवशी हे सांगितले, त्याच्या दुसर्‍या दिवशी मी बातम्यांत ऐकले की, चीन आणि पाकिस्तान या देशांत महापूर आला आहे.’ (२९ ऑगस्ट २०२०)

१०. कल्याणीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१० अ. कल्याणी बोलत असतांना ‘जणूकाही देवच सांगत आहे’, असे वाटणे : ती बोलत असतांना ‘जणूकाही देवच मला सांगत आहे’, असे मला वाटते. ती म्हणते, ‘‘आई, तू काही काळजी करू नको. सगळे काही ठीक होणार आहे. दुष्टपणे वागतील, त्यांचे वाईट होईल. देव त्यांना शिक्षा करील. जे चांगले वागतील, इतरांना साहाय्य करतील, त्यांचे रक्षण देव करील.

१० आ. कल्याणीच्या सहवासात शीण आणि ताण निघून जाणे : मी कुठल्या तरी विचारात असले किंवा माझ्या मनावर ताण असेल, तर कल्याणीच्या सहवासात आल्यावर ‘मी ताण विसरून वेगळ्या विश्वात रमते’, असे मला जाणवते.

१० इ. तिच्या लहानपणी अनेक वेळा तिचा तोंडवळा आणि शरिराच्या अन्य अवयवांवर ‘चंदेरी, सोनेरी, सप्तरंगी आणि मोरपिशी’ या रंगांचे कण आढळले आहेत आणि अजूनही कधी कधी आढळतात.

११. कल्याणीला आलेल्या अनुभूती

११ अ. घरात आणि आश्रमात देवतांचे दर्शन होणे

१. २७.६.२०२० या दिवशी रात्री मी अंधारातच शीतकपाट उघडून त्यातून पाणी घेतले. तेव्हा कल्याणी माझ्या समवेतच होती. ती मोठ्या आवाजात आनंदाने म्हणाली, ‘‘आई, मला इथे शीतकपाटाजवळ देव दिसत आहेत.’’ ‘तिचे बोलणे खरे आहे’, असे मला जाणवत होते. ती जिथे जिथे बोट दाखवत होती, तिथे तिथे मी मनोभावे नमस्कार केला. त्या वेळी माझी भावजागृती झाली.

२. एकदा तिने मला सांगितले, ‘‘मला सनातनच्या अष्टदेवतांच्या चित्रात गणपति, शिव, दुर्गादेवी, श्रीकृष्ण आणि हनुमान प्रत्यक्ष दिसले.’ एरव्हीही तिला अधूनमधून देव दिसत असल्याचे ती सांगते.

३. आता आम्ही सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात रहातो. तेव्हा काही वेळा ‘आश्रमात आणि आश्रमाच्या परिसरात तिला देव दिसतात’, असे ती मला सांगते.

११ आ. आश्रमात खेळतांना आकाशात आगीचे दृश्य दिसल्यावर वरुणदेवतेला प्रार्थना करणे आणि आग विझणे अन् हेच दृश्य दोन बालसाधकांनाही दिसणे : एप्रिल २०२१ मध्ये एकदा ती आश्रमात खेळत असतांना तिला आकाशात आगीच्या ज्वाळा दिसल्या. तेव्हा तिने वरुणदेवाला प्रार्थना केली. त्यानंतर पाऊस पडला आणि आग विझली. त्या वेळी तिला गणपतीचा मुकुट आणि पावले दिसली. नंतर गणपति अदृश्य झाला. विशेष म्हणजे हे सर्व दृश्य आश्रमातील कु. सोहम् बडगुजर (वय ९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि चि. दिव्या जोशी (वय ५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) या दोन बालसाधकांनाही त्याच वेळी दिसले अन् त्यांनीही प्रार्थना केली.

– सौ. श्रावणी फाटक (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक