विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आरोप फेटाळले !

प्रवीण चव्हाण पसार झाल्याची चर्चा !

डावीकडून देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण चव्हाण

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण यांचे अनेक व्हिडीओ असलेला एक ‘पेनड्राईव्ह’ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. राज्य सरकार आणि विशेष सरकारी अधिवक्ता मिळून विरोधकांना संपवण्याचे षड्यंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. ‘कशा प्रकारची कट कारस्थाने सरकार शिजवत आहे त्याची उदाहरणे आणि पुरावे मी या ‘पेनड्राईव्ह’मध्ये दिले आहेत’, असे फडणवीस यांनी सांगितले होते. फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर विशेष सरकारी अधिवक्ता प्रवीण चव्हाण पसार असल्याचे बोलले जात आहे; मात्र त्यांनी तातडीने प्रसारमाध्यमांसमोर येत स्वतःची बाजू मांडून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रवीण चव्हाण म्हणाले की, सरकार माझे नाही. मी सरकारमध्ये सहभागी नाही. माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा राजकारणाशी संबंध नाही. माझ्या संपूर्ण कार्यकाळात मी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. मी फक्त कार्यालयात बसलेला दिसत आहे. कार्यालयामधील कुठल्यातरी व्यक्तीला ‘मॅनेज’ करून व्हिडिओ चित्रित केला असावा. या व्हिडिओत फेरफार करण्यात आले आहेत. हे फेरफार कधी ना कधी बाहेरच येणार आहेत. केंद्रीय अन्वषेण विभाग (सीबीआय) किंवा कोणती चौकशी करायची, हे मी ठरवत नाही, तर सरकार ठरवते. एखाद्या प्रकरणात आरोपीला जामीन मिळत नसेल, तर सरकारी अधिवक्त्याला बाजूला काढल्यावर स्वतःची सुटका होईल, असे त्याला वाटत असते.