‘एन्.एस्.ई.’चे माजी समूह संचालक आनंद सुब्रह्मण्यम् यांना सीबीआयकडून अटक

आनंद सुब्रह्मण्यम्

चेन्नई – ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज’चे (एन्.एस्.ई.चे – राष्ट्रीय शेअर बाजाराचे) माजी समूह संचालक आनंद सुब्रह्मण्यम् यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) येथून अटक केली. एन्.एस्.ई.च्या कामकाजामध्ये ते अनावश्यक दखल देत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सुब्रह्यण्यम् एन्.एस्.ई.च्या माजी कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार होते. त्यांच्या सल्ल्यावरून चित्रा रामकृष्ण काम करत होत्या. चित्रा रामकृष्ण यांनी नियमांचे उल्लंघन करून कारभार केल्याने त्यांना ‘सेबी’ने (‘सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने) ३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. चित्रा रामकृष्ण यांनी दावा केला आहे, ‘त्यांना हिमालयातील योगीकडून मार्गदर्शन मिळत होते आणि त्या मार्गदर्शनाद्वारेच त्या एन्.एस्.ई.चा कारभार करत होत्या.’ अन्वेषण यंत्रणांना संशय आहे की, हिमालयातील योगी अन्य कुणी नसून आनंद सुब्रह्मण्यम् हेच आहेत. त्यादृष्टीने यंत्रणा सुब्रह्यण्यम् यांची चौकशी करत आहेत.