राष्ट्र आणि धर्म यांप्रती आस्था निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी युवा पिढीला धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगावे ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथील विद्यानिकेतन प्रशालेत ‘राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान

विद्यानिकेतन प्रशालेत बोलतांना श्री. मनोज खाडये आणि बसलेले अन्य मान्यवर

सोलापूर, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – शिक्षकांनी ज्ञानदानाचे कार्य करतांना श्री सरस्वतीदेवीचे पूजन करावे. मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे भारतीय संस्कृतीचा र्‍हास होऊन पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीनुसार आचरण केल्याने युवकांचे भविष्य अंधाराकडे जात आहे. त्यामुळे भावी पिढीला राष्ट्र आणि धर्म यांप्रती आस्था निर्माण व्हावी, यासाठी त्यांना शैक्षणिक काळापासून धर्मशिक्षण देण्यात यावे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी नुकतेच येथे केले. ते येथील ‘बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ’ संचालित विद्यानिकेतन प्रशालेमध्ये ‘राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

या वेळी श्री. मनोज खाडये म्हणाले, ‘‘हलाल इंडस्ट्री’ जगभरात सर्वाधिक वेगाने वाढणारी व्यवस्था बनली आहे. इस्लामच्या आधारे ‘हलाल इंडस्ट्री’ आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोठी बनत चालली आहे. हलाल अर्थव्यवस्थेमुळे विश्वभरात धोका निर्माण झाला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे ३ ट्रिलीयन डॉलर्सचा टप्पाही गाठला आहे. या अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्य मुसलमानांची बहुसंख्यांकांवर एक प्रकारची हुकूमशाहीच चालू आहे.’’

या वेळी ‘बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळा’चे उपाध्यक्ष बापूसाहेब ढगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. प्रारंभी बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख, कु. वर्षा जेवळे, श्री. संदीप ढगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. सुमित औसेकर यांनी केले, तर समारोप सौ. शोभा कटारे यांनी केला. या कार्यक्रमाला प्रशालेतील शिक्षक आणि कर्मचारी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.

शिक्षकांचे अभिप्राय

१. श्री. गोपी नवले आणि श्री. विद्याधर रंगदाळ – व्याख्यानातील विषय पुष्कळ महत्त्वपूर्ण होता. या माध्यमातून उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले.

२. श्री. सुदर्शन महिंद्रकर, ग्रंथपाल – श्री. मनोज खाडये यांनी इंग्रजांच्या मेकॉले शिक्षण पद्धतीचे दुष्परिणाम योग्य प्रकारे समजावून सांगितले, तसेच इस्लामी बँकांच्या कारभाराविषयी आकडेवारीसहित माहिती देऊन सर्वसामान्य भारतीय नागरिक आतंकवाद्यांना अप्रत्यक्षरित्या कसे साहाय्य करत आहेत ?, हे या मार्गदर्शनातून लक्षात आले. अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रत्येक शाळेत झाल्यास समाजजागृती होण्यास साहाय्य होईल.

३. ‘या व्याख्यानाच्या माध्यमातून राष्ट्ररक्षणार्थ शिक्षकांचे योगदान कसे असावे ? याविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली’, अशा प्रतिक्रिया अनेक शिक्षकांनी व्यक्त केल्या.