कोरोनाची लस घरोघरी जाऊन देणे शक्य नाही !

  • मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केंद्र सरकारने भूमिका मांडली

  •  लसीच्या परिणामकारकतेवर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई – कोरोनाची लस घरोघरी जाऊन देणे शक्य नाही; कारण तशी पद्धत अवलंबल्यास लस वाया जाण्याचे प्रमाण पुष्कळ वाढेल. लस दूषित होऊन तिच्या परिणामकारकतेवरही मोठा परिणाम होईल. लस घेण्याच्या ठिकाणालगत अतीदक्षता विभाग (आयसीयू) असायलाच हवा, असे बंधनकारक नाही; मात्र लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला ३० मिनिटे देखरेखीखाली ठेवणे, काही गंभीर परिणाम झाल्यास तातडीने योग्य पावले उचलणे हे घरोघरी लस देण्याच्या पद्धतीत नीट होऊ शकणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे.

७५ हून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारांमुळे घराबाहेर पडू न शकणारे किंवा अंथरुणाला खिळलेले नागरिक, विकलांग व्यक्ती यांच्यासाठी घरीच कोरोनाची लस देण्याविषयी गांभीर्याने काहीतरी करायला हवे, अशा विनंतीची जनहित याचिका उच्च न्यायालयातील अधिवक्त्या धृती कपाडिया आणि अधिवक्ता कुणाल तिवारी यांनी केली होती.