Goa Noise Pollution : गोव्यात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजना’ अधिसूचित

योजनेमध्ये उच्च न्यायालयाने विचारणा करूनही तक्रारीसाठी अधिकार्‍यांच्या ‘व्हॉटस्ॲप’ क्रमांकाऐवजी ‘लँडलाईन’ क्रमांकाचाच उल्लेख !

पणजी, ३ मे (वार्ता.) : गोवा राज्यात ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारने ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजना’ २ मे या दिवशी अधिसूचित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या आदेशाचा अवमान करून हणजूण येथे ध्वनीप्रदूषण केले जात आहे. या प्रकरणी अवमान याचिकेवर ३० एप्रिल या दिवशी सुनावणी करतांना गोवा सरकारने उच्च न्यायालयाला ३ मेपर्यंत ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजना’ अधिसूचित करणार असल्याचे सांगितले होते.

सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजनेमध्ये ‘नॉईज मॅपिंग’, ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवणे, नियमांचे उल्लंघन केल्यास दंड ठोठावणे, ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे आदींचा उल्लेख आहे. योजनेमध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणा बसवण्यासाठी अनुमती घेण्यासाठीची प्रक्रिया, सरकारने ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवण्यासंबंधीचे नियम, फटाके उडवण्यासंबंधीचे नियम, विविध प्रकारच्या वाहनांसाठी असलेली ध्वनीच्या पातळीसंबंधी माहिती आदी माहिती आहे. सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजनेमध्ये १४ मार्च २०२४ मध्ये अधिसूचित केलेल्या योजनेच्या तुलनेत फार कमी पालट करण्यात आले आहेत.

१४ मार्च २०२४ मध्ये अधिसूचित केलेल्या योजनेत नागरिकांना ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दूरभाष क्रमांक (लँडलाईन नंबर) आणि ई-मेल पत्ता देण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ३० एप्रिल या दिवशी सुनावणीच्या वेळी सरकारला विचारले होते की, ‘ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दूरभाष क्रमांक का दिला आहे ? ध्वनीप्रदूषणासंबंधी एखादी तक्रार नोंदवण्यासाठी किंवा ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रारीचा ई-मेल पहाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रात्री ११ वाजता कुणी असते का ? सरकारने दूरभाष क्रमांक देण्याऐवजी ‘ध्वनीप्रदूषण कुठे आणि कसे होते ?, हे दाखवणारा व्हिडिओ पाठवण्यासाठी एखादा क्रमांक नागरिकांना दिला पाहिजे होता. नागरिकांना ‘व्हॉटस्ॲप’वर व्हिडिओ काढून तो पाठवणे सोपे झाले असते.’ उच्च न्यायालयाने असे सांगूनही सरकारने ‘सुधारित ध्वनीप्रदूषण कृती योजनेमध्ये संबंधित अधिकार्‍यांचे दूरभाष क्रमांकाचाच (लँडलाईन नंबरचाच) उल्लेख केला आहे.