थोडक्यात महत्त्वाच

२७ मेपासून पावसाच्या प्रवासाची गती न्यून होणार !

हवामान तज्ञ डॉ. अक्षय देवरस यांचे विधान

मुंबई – भारतात मान्सून आलेला असला, तरी २७ मे पासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती न्यून होणार आहे. पश्चिम रशियावर निर्माण होणार्‍या जास्त दाबाच्या पट्ट्याचा परिणाम प्रथमच भारताच्या मोसमी पावसावर होईल, असे मत इंग्लंड येथे कार्यरत हवामान तज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केले आहे.


 

आत्महत्या करणार्‍या तरुणीच्या देहाचे २ तुकडे !

मुंबई – विक्रोळी पूर्वेला असणार्‍या कन्नमवार नगरमध्ये हर्षदा तांदोलकर (वय २५ वर्षे) या तरुणीने २२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. इतक्या उंचावरून उडी मारल्याने तिच्या देहाचे २ तुकडे झाले.


पोलीस उपनिरीक्षकाकडून वैद्यकीय अधिकार्‍यांना शिवीगाळ !

अकोला – दारूच्या नशेत पोलीस उपनिरीक्षक प्रभुदास गडलिंगे यांनी दहिहांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्‍यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच वैद्यकीय अधिकार्‍याला गुन्हा नोंदवून निलंबित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तक्रार प्रविष्ट केली. डॉ. सागर कळसकर असे तक्रारकर्त्या आधुनिक वैद्याचे नाव आहे.

संपादकीय भूमिका

असे पोलीस हे पोलीस खात्याला कलंकच !


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ६ जणांचा मृत्यू !

बीड – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी कारखान्यासमोरील पुलावर २६ मेच्या मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गढी पुलावर एक चारचाकी वाहनाची दुभाजकाला धडक बसल्याने किरकोळ अपघात झाला होता. ही गाडी दुभाजकावर अडकली होती. ती गाडी बाहेर काढण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतांना महामार्गावरून भरधाव जाणार्‍या ट्रकने ७ जणांना जोरात धडक देत चिरडले. या अपघातात ६ जण ठार, तर १ जण गंभीर घायाळ झाला आहे.


 

वाढवण प्रकल्पातील रोजगारांच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रम सिद्ध करा !

मत्स्यव्यवसाय आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांची सूचना

मुंबई – राज्यात वाढवणसारखा मोठा बंदर प्रकल्प सिद्ध होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. याचा सर्वाधिक लाभ किनारपट्टीच्या जिल्ह्यांना होणार असून तेथे कुशल कामगार वर्गासाठीचे प्रशिक्षण आतापासूनच चालू करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करा, अशी सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरेविकासमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. मंत्रालयामध्ये वाढवण बंदरातील रोजगार आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांविषयी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.