कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या कृपेने रविवार, ३ नोव्हेंबरला (भाऊबीज) कोल्हापूर येथे एकल संपूर्ण गीत रामायणाचा विक्रमी प्रयोग होत आहे. हे गीतरामायण श्री. रोहित जोशी सादर करणार असून सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनात सादर होणार आहे. या कार्यक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार आहे. महाराष्ट्रातील किंबहुना देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचे सादरीकरण होत असून त्यात एका दिवसात ५६ गीते केवळ एक गायक गाणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री. रोहित जोशी यांनी करवीरधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
श्री. रोहित जोशी पुढे म्हणाले, ‘‘कलाप्रेमी छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कलानगरीत भावातीर्थ स्वर्गीय बाबूजी तथा सुधीर फडके यांचे संगीत आणि गायन शब्दप्रभु मराठी आधुनिक वाल्मिकी स्वर्गीय ग.दि. माडगूळकर यांचा प्रतिभासंपन्न काव्याविष्कार यातून साकारलेले महाकाव्य संपूर्ण गीतरामायण एकट्याने सादर करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमास तबला साथ श्री. प्रशांत देसाई, संवादिनी स्वानंद जाधव, व्हायोलिन श्री. केदार गुळवणी, असे दिग्गज कलाकार साथ देणार आहेत. या कार्यक्रमाचे संयोजन सौ. धनश्री लिमये-जोशी यांनी केले आहे. तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे.’’
या प्रसंगी सौ. धनश्री लिमये-जोशी, सौ. मिताली जोशी, ब्राह्मण सभा करवीरचे कार्यवाह श्री. श्रीकांत लिमये, कोल्हापूर चित्तपावन संघाचे अध्यक्ष श्री. मकरंद करंदीकर, उपाध्यक्ष श्री. प्रसाद भिडे यांसह अन्य उपस्थित होते.