मुंबई – डिजिटल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी सायबर घोटाळ्यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करू. जगभरात ‘एआय’चा गैरवापर होत आहे. हा दुरुपयोग रोखण्यासाठी जागतिक स्तरावर नियमावली सिद्ध करण्याचे आवाहन मी केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथील वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF)’ या खासगी कार्यक्रमासाठी ‘जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले,…
१. भारतीय बँकिंग व्यवस्था आता नेटबँकिंग आणि ॲप यांच्या माध्यमातून २४ घंटे असते. एकेकाळी लोक संसदेत मला सांगायचे, ‘भारतात बँकांच्या पुरेशा शाखा नाहीत. गावात बँका किंवा इंटरनेट सुविधा नाही. मग ‘फिनटेक क्रांती’ कशी होणार ? पण एका दशकात ब्रॉडबँड इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ६० दशलक्षहून ९४० दशलक्षापर्यंत पोचली. करोना महामारीच्या काळातही भारतात बँकिंग सुविधा मंदावली नाही. क्युआर् कोड आणि युपीआय यांमुळे बँकांचे व्यवहार २४ घंटे चालू असतात.
२. ऑगस्ट महिन्यात अनेक सण असतात, नुकतीच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाली. भारतात जसा सणांचा उत्साह आहे, तसाच अर्थव्यवस्था आणि बाजार येथेही उत्साह दिसत आहे.
३. पूर्वी जेव्हा विदेशातील लोक भारतात आल्यावर सांस्कृतिक विविधता पाहून अचंबित होत; पण आता जेव्हा ते भारतात येतात, तेव्हा ‘फिनटेक’ विविधता पाहून आश्चर्यचकित होतात. विमानतळावर उतरल्यापासून ते रस्त्यावरील खरेदी करेपर्यंत सर्व ठिकाणी ‘फिनटेक’ पद्धत आहे. ‘करन्सी ते क्यु.आर्. कोड’, अशी फिनटेक क्रांती भारताने केली.