म्हापसा, १६ ऑगस्ट (वार्ता.) – ध्वनीप्रदूषणासंबंधी नियम न पाळल्याविषयी वागातोर येथील ‘थलासा बाय क्लिफ’ या उपाहारगृहाचे मालक सिलरॉय मास्केल यांच्या विरोधात हणजूण पोलीस ठाण्यामध्ये ध्वनीप्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम २००० अन् पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम १५ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ओझरांत, वागातोर, बार्देश या ठिकाणी असलेल्या या उपाहारगृहातून वाजवल्या जाणार्या संगीतामुळे ध्वनीप्रदूषण होत होते. ठरवून दिलेल्या वेळेच्या नंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यात येत होते. पोलिसांनी या उपाहारगृहात अन्वेषण करून पायोनियर डीजे मिक्सर, डिसप्ले बोर्ड, डॉयनाटेक आस्थापनाचे स्पीकर्स इत्यादी साहित्य जप्त केले आहे. या ध्वनीप्रदूषणामागे अमली पदार्थ व्यावसायिकांचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे गोवा राज्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘‘सर्वसाधारण माणूस तिथे उपाहारगृहात जाऊन अशा प्रकारचे संगीत ऐकू शकत नाही. केवळ तुम्ही नशेत असलात, तरच ते संगीत ऐकू शकता. गोव्यामध्ये अमली पदार्थ व्यावसायिकांचा पुष्कळ प्रभाव आहे.’’