नवी मुंबई, २५ जून (वार्ता.) – भविष्यातील नोकरीच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास शिक्षणावर भर द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सानपाडा येथे केले. श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट, नेरूळ या संस्थेच्या वतीने गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्याच्या धनादेशाचे (चेक) वाटप करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील श्री दत्त विद्यामंदिर शाळेत हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी ‘श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट’चे अध्यक्ष राधाकृष्णन सर, सचिव ललिता मॅडम, संध्या सुधीर, माजी नगरसेविका कोमलताई वास्कर, मुख्याध्यापक मंगल भोईर आदी उपस्थित होते.
या वेळी ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणार्या ‘शिक्षांगण’शिकवणी वर्गातील २० विद्यार्थी, तसेच नवी मुंबई महापालिकेच्या ६ माध्यमिक विद्यालयांतील २६ विद्यार्थी यांना हे आर्थिक साहाय्याचे धनादेश वितरण करण्यात आले.
सोमनाथ वास्कर पुढे म्हणाले की, समाजातील दानशूर व्यक्तींनी होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची आवश्यकता आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ‘श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट’ हा उपक्रम मागील अनेक वर्षांपासून अखंडपणे राबवत आहे. याविषयी त्यांचे आभार व्यक्त करत आहे.
राधाकृष्णन म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन शिक्षण घ्यावे. समाजातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून आर्थिक साहाय्य दिले जाते. त्यामुळे भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे खचून न जाता उत्तम शिक्षण घेण्याचा निश्चय मनाशी बाळगून पुढील वाटचाल करावी. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी ट्रस्टकडे अर्ज करावे.
मंगल भोईर म्हणाले की, मुलांनी या आर्थिक साहाय्याची जाणीव ठेवली पाहिजे. आई – वडील यांच्या नंतर ज्यांनी आपल्या आयुष्यात विविध टप्प्यांवर साहाय्य केले, त्यांना कधीही विसरता कामा नये.