धारगळ येथे विकलेल्या भूमीची पुन्हा दुसर्‍या व्यक्तीला विक्री

५५ लाख रुपयांना फसवले

पणजी, १९ जून (वार्ता.) – धारगळ येथे वर्ष २०१२ मध्ये विकलेली भूमी पुन्हा विकून म्हापसा येथील एका व्यक्तीला ५५ लाख रुपयांना फसवल्याच्या प्रकरणी पेडणे पोलिसांनी एक महिला आणि तिचा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. विजया रमेश प्रभुदेसाई आणि देवेंद्र रमेश प्रभुदेसाई, अशी या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी म्हापसा येथील प्रकाशराव दत्ताराम नाईक यांनी तक्रार प्रविष्ट केली होती.
प्रभुदेसाई मायलेकांनी धारगळ येथील सर्वेक्षण क्रमांक ४२८/० मधील भूमी मरड, म्हापसा येथील रहिवासी प्रकाशराव नाईक यांना ५५ लाख रुपये किमतीला विकली होती. याचे विक्रीपत्र (सेल डीड) २३ ऑक्टोबर २०१७ या दिवशी पेडणे येथील उपनिबंधक कार्यालयात करण्यात आले होते. हीच भूमी मायलेकांनी संतोष दहिया (रहाणारा देहली) यांना वर्ष २०१२ मध्ये विकल्याचे प्रकाशराव नाईक यांना आढळून आले. त्याचीही नोंदणी पेडणे उपनिबंधक कार्यालयात करण्यात आली होती. फसवणूक झाल्याचे आढळून आल्यावर प्रकाशराव नाईक यांनी १८ जून या दिवशी पेडणे पोलिसांत रितसर तक्रार नोंदवली.

संपादकीय भूमिका 

एकाच भूमीची दुसर्‍यांदा विक्री होत आहे, हे संबंधित उपनिबंधक कार्यालयाच्या लक्षात कसे येत नाही ? हा भोंगळ कारभार कि भ्रष्टाचार ?