मोरजी येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप

मोरजी ग्रामस्थांनी घेतली ‘विशेष अन्वेषण पथका’कडे धाव

पणजी, १४ जून (वार्ता.) – मोरजी येथील १ लाख ८० सहस्र चौ.मी. भूमी ‘जी.सी.ए. घाया इन्फ्रा’ आणि ‘इरप इन्फ्रा’ या २ आस्थापनांनी बळकावल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. मोरजी ग्रामस्थांनी भूमी बळकावल्याच्या प्रकरणी शासनाने स्थापन केलेल्या विशेष अन्वेषण पथकाकडे धाव घेतली आहे.

मोरजी ग्रामस्थांच्या मते संबंधित दोन्ही आस्थापनांनी भूमीच्या मूळ मालकांना अंधारात ठेवून भूखंड बनवणे आणि तेथे बांधकाम करणे चालू केले आहे. यामध्ये सर्वेक्षण क्रमांक ११/० ही स्थानिक मंदिरासंबंधीची भूमी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी गतवर्षी नोव्हेंबर मासात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कह्यात घेतलेल्या संशयितांच्या ३९ कोटी २४ लाख रुपये किमतीच्या ३१ स्थावर मालमत्ता कह्यात घेतल्या होत्या. तसेच ‘ईडी’ भूमी बळकावल्याच्या प्रकरणी संशयित विक्रांत शेट्टी, महंमद सोहेल, राजकुमार मैथी आणि इतर यांच्या विरोधात अन्वेषण करत आहे.