मरीन ड्राईव्हपासून हाजी अलीपर्यंतची मुंबई सागरी किनारा मार्गिका ११ जूनपासून सर्वांसाठी कार्यरत !

मुंबई – धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाच्या मरीन ड्राईव्हपासून हाजी अली पर्यंतच्या मार्गिकेची १० जून या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ‘अँटिक कार’मधून पहाणी केली. ही सागरी किनारा मार्गिका ११ जूनपासून सर्वांसाठी कार्यरत होणार आहे. या मार्गिकेमुळे पाऊण घंट्याचे अंतर १० मिनिटांत कापता येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘या उत्तर वाहिनी मार्गिकेमुळे शहरातील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे. भुलाभाई देसाई मार्ग, बॅरिस्टर रजनी पटेल चौक आणि वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली चौक) पर्यंत जाणे सुलभ होणार आहे. सागरी किनारा मार्गाचा पहिला ९ किलोमीटरचा टप्पा चालू यापूर्वीच चालू झाला आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंतचा सव्वा सहा किलोमीटरचा हा दुसरा टप्पा आहे. जुलै महिन्यापर्यंत नरिमन पॉईंट ते वरळी हा सागरी मार्गाचा तिसरा टप्पाही चालू होईल. हा बोगदा अत्यंत अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आला आहे. अत्यावश्यक परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्यासाठी टेलिफोनही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मी स्वतः नियंत्रण कक्षाशी संपर्क करून आपत्कालीन परिस्थितीत कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो हे जाणून घेतले आहे.’’