येत्या २ वर्षांत अयोध्येत महाराष्ट्र सदन उभे रहाणार ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई – अयोध्येत २.३२७ एकर भूमीवर महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी उत्तरप्रदेश शासनाने अनुमती दिली आहे. येत्या २ वर्षांत महाराष्ट्र सदन उभे राहिल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

या वेळी रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘‘अयोध्येत शरयू नदीजवळ उत्तरप्रदेश शासन रहितक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र सदन उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र सदनासाठी भूखंड खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून ६७ कोटी १४ लाख रूपये संमत करण्यात आले आहेत. इमारतीचे बांधकाम, विद्युतीकरण आणि अन्य सुविधा यांसाठी अनुमाने २६० कोटी रुपये इतका व्यय येईल. नियमित लाखो भाविक अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी जात आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. या भाविकांच्या सोयीसाठी अयोध्येत लवकरच महाराष्ट्र सदन उभे रहाणार आहे.’’

रेल्वेस्थानक आणि विमानतळ यांपासून महाराष्ट्र सदन किती दूर ?

अयोध्या धाम रेल्वेस्थानकापासून महाराष्ट्र सदन साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून महाराष्ट्र सदन ११ किलोमीटर अंतरावर आहे.