(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्यावरील तात्पुरते उपाहारगृह आणि मद्यविक्री केंद्र)
पणजी, १ जून (वार्ता.) – हवामान खाते आणि संबंधित खाती यांच्याशी सल्लामसलत करून शॅक आणखी किती दिवस चालू ठेवायचे यासंबंधी पर्यटन खात्याकडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘सध्या शॅक चालू रहातील. निवडणुकीमुळे राज्यात येणार्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. सध्या गोव्यात स्थानिक पर्यटक मोठ्या संख्येने यायला प्रारंभ झाला आहे; मात्र शॅक चालवणार्यांनी पर्यटकांच्या सुरक्षिततेचे उत्तरदायित्व घेतले पाहिजे.’’ सध्या सरकारने कुळे येथील दूधसागर धबधब्यावर जाणार्या जीप गाड्यांना पावसाळा चालू होईपर्यंत सेवा चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे.
पर्यटकांनी दायित्वाने वागले पाहिजे !
पडक्या खाणी आणि इतर धोकादायक ठिकाणी बुडून झालेल्या मृत्यूंविषयी पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘पर्यटकांनी दायित्वाने वागले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःला उत्तरदायी धरले पाहिजे. काही घटनांनंतर आम्ही सर्व लोकांना आणि पर्यटकांना परिपत्रक प्रसारित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर काही खाण आस्थापनांना पडक्या खाणींच्या भोवती कुंपण घालण्यास सांगण्यात आले आहे. सर्व गोष्टींना सरकारला उत्तरदायी धरू शकत नाही. मी युवकांना आवाहन करतो की, त्यांनी पर्यटनासाठी सुरक्षित ठिकाणी जावे आणि आनंद घ्यावा.’’
कोकण रेल्वेने मडगाव रेल्वेस्थानकावर पर्यटकांना भाड्याने चारचाकी किंवा दुचाकी सेवा देण्याचे ठरवले असून याचा स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होऊ नये, या दृष्टीने याविषयीचे सूत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे, तसेच कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे मांडले आहे, असेही पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले.