मुंबई, ३१ मे (वार्ता.) – विनावापर पडून असलेल्या म्हणजेच वापरात नसलेल्या राज्यातील औद्योगिक भूखंडांची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील औद्योगिक विकास महामंडळांमध्ये विनावापर पडून असलेल्या भूखंडांची माहिती समोर येईल, तसेच त्यासाठी अन्य उद्योजकही पुढे येऊ शकतील. यामुळे विनावापर भूखंड बळकावण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे. याविषयी अभ्यास करण्यासाठी शासनाने ३० मे या दिवशी एका समितीची स्थापना केली आहे.
उपयोगात नसलेल्या भूखंडांचा वापर करणे, अशा भूखंडांचे पुनर्वाटप करणे, औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येणार्या उद्योगसमूहांना पायाभूत सुविधा पुरवणे, उद्योगसमूहांच्या सहकार्याने बेरोजगार युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देणे यांकडे समिती लक्ष देणार आहे. महाराष्ट्रातील उद्योगांना चालना देणे आणि उद्योगातील समस्यांचे निराकरण करणे यांविषयीचा अहवाल समिती सरकारला सादर करणार आहे.