नवी देहली – निवडणुकीत समान नावे असलेल्या उमेदवारांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले, ‘जर एखाद्याचे नाव राहुल गांधी किंवा लालूप्रसाद यादव असेल आणि त्याच नावाचे अन्य उमेदवारही त्याच मतदारसंघात असतील, तर त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखता येणार नाही.’
१. साबू स्टीफन नावाच्या याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले होते की, प्रसिद्ध मतदारसंघांमध्ये उभा असणार्या उमेदवाराच्या नावाचा दुसरा उमेदवार उभा करणे, ही जुनी युक्ती आहे. त्यामुळे मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. समान नावांमुळे लोक चुकीच्या उमेदवाराला मत देतात आणि योग्य उमेदवाराची हानी होते. प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष जाणीवपूर्वक असे उमेदवार उभे करतात. त्या बदल्यात नामधारक उमेदवाराला पैसे, वस्तू आणि इतर अनेक लाभ मिळतात.
२. यावर न्यायालय म्हणाले की, मुलांचे नाव त्यांचे पालक ठेवतात. एखाद्याच्या आई-वडिलांनी मुलाचे नाव इतर कुणाच्या नावाप्रमाणे ठेवले असेल, तर त्याला निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल ? यामुळे त्यांच्या अधिकारांवर परिणाम होणार नाही का ?